शिरूर तालुकाही आकडेवारीत येतोय पुढे
महाबुलेटिन नेटवर्क
शिक्रापूर : शिरूर तालुक्यात विविध गावामध्ये कोरोनाचा शिरकाव वाढला आसून तालुक्यातील रुग्ण संख्येने दोनशेचा आकाडा पार केला आहे. शिक्रापूर,शिरूर,रांजणगाव, कारेगाव, सणसवाडी आदी भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे .नुकतेच शिक्रापूर येथे एकाच दिवशी सात व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आले, असून यामध्ये एका खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरचा देखील समावेश आहे. शिरूर तालुक्यात शहर व ग्रामीण भागात दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.
बुधवारी शिक्रापूर येथील तळेगाव रोड परिसरातील एका सोसायटी मध्ये एक, मलठण फाटा परिसरातील सोसायटी मध्ये दोन, २४ वा मैल वस्ती वरील एक, पुणे रोड लागतच्या एका वस्तीमध्ये एक, तर विठ्ठलवाडी गावातील एक युवक वेगळ्या आजाराने रुग्णालयात दाखल असताना त्याचा कोरोना अहवाल तपासाला असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.मात्र त्या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर देखील कोरोना बाधित झाले आहे. शिक्रापूर येथील सदर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आलेल्या आहेत. शिक्रापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सर्व रुग्णांची माहिती घेत त्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.तसेच ग्रामपंचायतच्या वतीने रुग्ण राहत असलेल्या परिसरात फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.