सरपंचांची गांधीगिरी : मास्क न घालणाऱ्यांना दिले मोफत मास्क
नारायणगाव येथे सरपंच योगेश पाटे यांची गांधीगिरी
मास्क न घालणाऱ्या नागरिकांना स्वतः घातले मोफत मास्क
महाबुलेटीन न्यूज / किरण वाजगे
नारायणगाव : श्री गणेशोत्सवास आज सर्वत्र उत्साहात प्रारंभ झाला आहे. श्रीं’चे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी उत्साहाच्या भरात गावामध्ये मोठी गर्दी केली आहे. असे असताना श्री गणेशाची मूर्ती वाजत गाजत घरी नेण्यासाठी व पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी श्री गणेशभक्त, भाविक व नागरिकांनी आज नारायणगावात मोठी गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडाला. या अनुषंगाने नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी गांधीगिरी करत ज्या नागरिकांनी मास्क घातले नाही, त्यांना स्व खर्चाने स्वतः मास्क घातले.
यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य हे देखील होते. आज सकाळपासून दुपारपर्यंत सरपंच पाटे ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचाऱ्यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी व ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून कार्यवाही केली.
गर्दी करणे, मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे या प्रकारामुळे दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नारायणगावात वाढली असताना सरपंच पाटे व त्यांच्या टीमच्या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
—–