भुयारी मार्ग झाल्याशिवाय रस्ता होऊन देणार नाही : शेतकरी
नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी रोखले
महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : येथे गेली अनेक दिवसांपासून चालू असलेल्या पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याचे काम आज ( दि. २२ ) शेतकऱ्यांकडून बंद करण्यात आले.
येथील पाटे-खैरे मळ्यापासून खडकवाडीकडे जाणारा जूना नारायणगाव-पारगाव रस्ता पुन्हा एकदा वादात अडकला असून येथील रस्ता भुयारी मार्ग करून करावा अथवा पूल करून करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. येथील पाटे-खैरे मळा व खोडद रस्त्यावर भुयारी मार्ग करण्याचे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांना दिले होते. तरीदेखील रस्ता बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने हा रस्ता चालूच कसा केला ? असा सवाल यावेळी येथील बाधीत शेतकरी नामदेव खैरे यांनी केला.
शेतकऱ्यांनी बाह्यवळण रस्त्यावर पूल करून रस्त्याच्या खालून किमान बैलगाडी व मोटरसायकल जाईल एवढा तरी रस्ता करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. या मागणीसाठी आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव खैरे तसेच खडकवाडी व पाटे-खैरे मळा येथील ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम बंद पाडले.
यावेळी नामदेव खैरे यांच्यासह जालिंदर खैरे, प्रशांत खैरे, आकाश खैरे, शांताराम फुटाणे, नवनाथ खैरे, सोनू खैरे, पप्पू खैरे, गौरव खैरे, बाबू खैरे, प्रसाद खैरे, शेटे, पाटे व वाजगे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
——