काव्यमंच : चारोळ्या श्रावण सरींच्या
चारोळ्या श्रावण सरींच्या
१]सरसर झरझर
येते श्रावणाची सर
पावसाची राहिलेली
पुरी करण्या कसर॥
२]गेला मृग ही आषाढ
आला असा श्रावणात
तुझं श्रावणाचं नातं
पावसारे भावनात॥
3]सरसर झरझर
सरी आल्या गात गात
ओसरीत माझिया ग
श्रावणात नाचतात॥
४]कधी येते कधी जाते
झिम झिमत झिमत
खेळ श्रावणाची सर
लपाछपीचा खेळत॥
५]कधी श्रावणाची सर
येते उन्हामधे न्हात
रविकिरणांच्या सवे
धून श्रावणाची गात॥
–निसर्ग सखी सौ मंगला मधुकर रोकडे.