भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन
महाबुलेटीन नेटवर्क / अविनाश घोलप
घोडेगाव : दत्तात्रयनगर, पारगाव ( ता. आंबेगाव ) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२०-२१ च्या पूर्वतयारी अंतर्गत मशिनरी ओव्हर ऑयलिंग करुन जोडणीचे कामास मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांच्या शुभहस्ते करुन सुरुवात करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून नव्या हंगामाच्या तयारीसाठी केलेला पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला.
कारखान्याच्या सन २०२०-२१ गळीत हंगामाची तयारी सुरु झाली आहे. कारखान्याचा गाळप हंगामाचा आढाव्याबाबत माहिती देताना कारखान्याचे चेअरमन श्री. बेंडे म्हणाले की, येत्या गळीत हंगामाकरीता एकूण ८ लाख मे. टन गाळप करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट्य असून त्या दृष्टिने ऊस तोडणी वाहतुक करणेकामी ४०० टायरबैलगाडी, २०० ट्रॅक्टर टायरगाडी व २५० टोळीसह ट्रक / ट्रॅक्टरचे करार पुर्ण झालेले आहेत. याशिवाय नविन ऊस तोडणी यंत्र खरेदी करणाऱ्या कंत्राटदारांसाठी कारखान्याचे संस्थापक, संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार व राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक योजना संचालक मंडळाने जाहीर केली आहे. कंत्राटदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १५ ऊस तोडणी यंत्र कंत्राटदारांशी करार झाले आहेत. कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा गाळप हंगाम मोठा असल्याने ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. सभासदांनीही आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा, असे आवाहन श्री. बेंडे यांनी केले आहे.
मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे, संचालक अशोक घुले, बाबासाहेब खालकर, ज्ञानेश्वर अस्वारे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे आदी उपस्थित होते.