भांबोली गावात पुन्हा लॉकडाऊन, पदभार स्वीकारताच सरपंच लागले कामाला
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचयातचा निर्णय, मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईची सरपंचाची मागणी

शिंदे वासुली : चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील वासुली फाटा बाजारपेठ कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे एक महिन्यापूर्वी चालू झालेले व्यवसाय काही अंशी पुर्वपदावर येत असताना आजपासून भांबोली ग्रामपंचायतीने कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने सूचित केल्याप्रमाणे पुन्हा एकदा लॉक डाऊन घोषित केल्याने संपूर्ण बाजारपेठ शट डाऊन झाली आहे. त्यामुळे वासुलीफाटा परिसरात शूकशूकाट होता.
खेड तालुक्यात कोविड १९ चा प्रादूर्भाव वाढून तालुका रेड झोनमध्ये गेला आहे. त्यामुळे शासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ४ जूलैला खेडमध्ये सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याचे सूचित केले होते. त्यानूसार खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ६ जूलै ते १३ जूलै पर्यंत सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत निर्बंध घालण्याची परवानगीचे पत्र देण्यात आले होते.
भांबोली ग्रामपंचायत हद्दीतील वासुलीफाटा परिसरात मोठी बाजारपेठ व नागरिकांची वर्दळ असते. येथील नवनिर्वाचित सरपंच भरत लांडगे यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन नियमानुसार अत्यावश्यक सेवा व्यवसाय वगळून सर्व दुकाने ६ जूले ते १३ जूलै पर्यंत पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वासुलीफाट्यावरील बाजारपेठ बंद असून परिसरात शूकशूकाट आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेची भाजीपाला, दूध, किराणा आदी दुकाने लॉक डाऊन काळात रोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच चालू असतील. त्यामुळे फाट्यावर फक्त मेडीकल आणि दवाखानेच चालू आहेत.
परंतु वासुली फाटा व परिसरात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही उपाययोजना स्थानिक प्रशासन, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून केलेली दिसून आली नाही. अजूनही काही नागरिक फाट्यावर विना मास्क फिरताहेत. चार चौघे मिळून गप्पा मारत आहेत. यासाठी भांबोली ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
“प्रांताधिकाऱ्यांच्या पत्रानुसार कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आजपासून १३ जूलै पर्यंत आमच्या हद्दीतील सर्व दूकाने बंद असणार आहेत. लॉक डाऊन काळात नियम भंग करणाऱ्यावर ग्रामपंचायत योग्य ती कारवाई करणार आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महाळूंगे पोलीस ठाण्याची मदत घेणार आहे. त्यामुळे सर्व नागरिक, व्यावसायिक, व्यापारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.”-भरत लांडगे ( नवनिर्वाचित सरपंच भांबोली )