ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर
चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण, जय भोले अमरनाथ सेवा संघ व वाघजाईमाता देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण खराबवाडी येथील वाघजाईनगर ( ता. खेड ) येथे संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र कथायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसीय सोहोळ्यात कथाकार सद्गुरु ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांचा ‘ज्ञानेश्वर भक्ती’ कथनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याच सोहोळ्यात कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांच्या ‘ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचे’ प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जुन्नर शिवनेरीचे आमदार शरद सोनवणे, खेडचे आमदार बाबाजी काळे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे, शिवसेना महिला आघाडी संघटिका विजयाताई शिंदे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर, प्राध्यापिका आणि कवियत्री शालिनी सहारे, उद्योगपती तात्यासाहेब कड, मसापचे मधुकर गिलबिले गुरुजी, डॉ. विजय गोकुळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांनी सर्व सामान्य लोकांना ज्ञानेश्वरी समजावी यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथातील ९०३४ ओव्यांचा अर्थ काव्यरूपात गुंफून १२८४ कविता ग्रंथ स्वरूपात आणल्या. या ग्रंथासाठी तब्बल ९ वर्षे लागली असून माऊलींवरची निस्सीम भक्ती, ज्ञानेश्वरीचा दांडगा अभ्यास आणि साधना यामुळेच हे शक्य झाल्याची भावना यावेळी ज्ञानेश्वर शिळवणे यांनी व्यक्त केली. यावेळी संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि स्वतः गायलेल्या कवी शिळवणे लिखित पसायदानाच्या अर्थावरील सुरेल गीताचे प्रसारण करण्यात आले. आदेश टोपे यांनी सूत्रसंचालन केले, तर रामदास धनवटे यांनी आभार मानले.