वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार… स्व. भुजंगराव सखाराम कड पाटील सोशल फाऊंडेशनचा उपक्रम..
वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
स्व. भुजंगराव सखाराम कड पाटील सोशल फाऊंडेशनचा उपक्रम..
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
राजगुरूनगर : संतोषनगर ( ता.खेड ) येथील स्व. भुजंगराव सखाराम कड पाटील सोशल फाऊंडेशनच्या वतीने एस. एस. सी. मार्च 2020 आणि एप्रिल 2021 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार समारंभ वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
यावेळी खेडचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य रामदास व्यवहारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वाकीच्या सरपंच वैशाली जरे, स्व.भुजंगराव कड पा. सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. नवनाथ कड पा. आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नागनाथ विभुते यांना “राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार 2018” मिळाल्याबद्द्ल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच एस.एस.सी. परिक्षा मार्च 2020 व एप्रिल 2021 मध्ये पहिल्या पाच गुणानुक्रमांना सन्मानचिन्ह व वृक्ष भेट देऊन गौरवण्यात आले.
मार्गदर्शक मनोगतात उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे म्हणाले की, “माहिती तंत्रज्ञान युगात अनेक नविन संधी आहेत, त्याकडे पाहताना ध्येय निश्चिती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सनदी सेवाची तयारी करतानाच्या अभ्यासाची पध्दत, नियोजन करणे, तसेच प्लान बी देखील करायला हवा.”
प्रदीप रौंधळ (RFO) म्हणाले की, “गुणवंत विद्यार्थ्यांनी करियर करताना सामाजिक जाणिव ठेवणे गरजेचे आहे, मेडिकल, इंजीनियरिंग, कृषी, सनदी सेवा, वकीली सारखे अनेक क्षेत्रांत करियर करता येऊ शकते.”
यावेळी गावातील नागरिक, भैरवनाथ विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार, माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार आदेश टोपे यांनी केले.
००००