स्वरश्री संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी शास्त्रीय गायन, सरोद वादनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाबुलेटीन न्यूज | ज्ञानेश्वर टकले
पिंपरी : थेरगाव येथील स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्वरश्री संगीत महोत्सवात शास्त्रीय गायक शिवानंद स्वामी, प्रसिद्ध सरोद वादक राजन कुलकर्णी यांचे सरोदवादन, तर प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांच्या शास्त्रीय गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृह येथे दोन दिवसीय संगीत महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.
शास्त्रीय गायक शिवानंद स्वामी यांनी बडाख्याल विलंबित एकतालामध्ये राग सरस्वती रंजनी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी ताल तीन तालमध्ये सबमिल आओ ही बंदिश सादर केली. याबरोबरच संत तुकाराम महाराजांचा ‘देखूनिया तुझ्या रूपाचा आकार’ अभंगाने वातावरण प्रफुल्लित केले. त्यांना तबल्यावर गणेश तानवडे यांनी, हार्मोनियमवर गंगाधर शिंदे यांनी, तर तालवाद्यावर मकरंद बादरायणी व शिवाजी डाके यांनी साथसंगत केली. तानपुरा व गायनसाथ उदयराज सूर्यवंशी, प्रसाद इंगळे व नवनाथ फडतरे यांनी केली.
प्रसिद्ध सरोद वादक पं. राजन कुलकर्णी यांनी राग यमन सादर केला. सरोदच्या सुरात रसिक तल्लीन झाले होते. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना तबल्यावर किशोर कोरडे यांनी, तर तानपुरा साथ संदीप रायकर यांनी दिली.
पहिल्या दिवसाची सांगता करताना शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर यांनी बडाख्याल विलंबित झपतालामध्ये ‘सखी मोरी रूमझूम’, तसेच ‘रूप पाहता लोचनी’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग सादर केला. रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना तबल्यावर सचिन पावगी, हार्मोनियमवर गंगाधर शिंदे, पखवाजावर गंभीर महाराज, टाळ साथ शिवाजी डाके, तानपुरा साथ आदिती नगरकर, अद्वैया आपटे यांनी केली.
प्रास्ताविक आयोजक नामदेव शिंदे यांनी, तर सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.