महाबुलेटीन BREAKING : श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट ची १२७ वर्षांची परंपरा खंडित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने यंदा दगडूशेठचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा करण्याचा ट्रस्टचा निर्णय
महाबुलेटीन न्यूज : विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून यावर्षी दगडूशेठ गणपती ट्रस्ट मंदिरामध्येच साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
दरवर्षी दगडूशेठ गणपती हा पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या कोतवाल चावडी या ठिकाणी एखाद्या ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती उभारून त्यात विराजमान व्हायचे. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे गणेश भक्तांचे हित लक्षात घेऊन मागील १२७ वर्षांची परंपरा खंडित करून यावर्षी प्रथमच मंदिरात विराजमान होणार आहे. मांडव किंवा मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार नाही. अतिशय साधेपद्धतीने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम पाळत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात व शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून गणेशोत्सव काळात दगडूशेठ गणपती दर्शनाला होणारी गर्दी टाळून कोरोना संक्रमण साखळी थांबविण्यासाठी दरवर्षी रस्त्यावर होणारा गणेशोत्सव यावर्षी मंदिरातच साजरा करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
तसेच मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या आॅनलाईन दर्शन सुविधा व आॅनलाईन कार्यक्रमांवर ट्रस्ट भर देणार असल्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.