शिक्षणाचा गुणवत्तापूर्ण इंदापूर ब्रँड महाराष्ट्रात विकसित : हर्षवर्धन पाटील
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : केंद्र सरकारने जाहिर केलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर राज्याच्या नावलौकिकास पात्र ठरेल असा इंदापूर ब्रँड तयार झाला आहे. तो अधिक गुणात्मक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत माजी मंत्री व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
वनगळी येथील शहाजी पाटील विकास प्रतिष्ठान, इंदापूर येथील तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. इंदापूर महाविद्यालयातील शाहीर अमरशेख सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाखेतील दहावी व बारावीमध्ये गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा व श्री नारायणदास रामदास इंग्रजी मिडीयम, एस. बी. पाटील वनगळी, कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक विद्यालय कुरवली, शहाजीराव पाटील विद्यालय रेडा, शिवाजी एज्युकेशन सोसायटीची बारावी विज्ञान शाखा या १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा या वेळी पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आपल्या भाषणात हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पुढील पन्नास वर्षांचे व्हिजन समोर ठेवून गुणात्मक, उत्तम नागरिक घडविणारे, संशोधनावर आधारित, संस्कृती जोपासणारे, बदलत्या परिस्थितीत ही करिअर निर्माण करणारे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा व शिक्षणपद्धतीचा अवलंब करत, खास आपल्या शैक्षणिक संस्थेचा ब्रँड तयार करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांचे आयुष्य घडणार आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून राष्ट्र घडणार आहे. मुलींनी चांगले यश संपादन केले आहे.
जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील म्हणाल्या की, सामाजिक मिडिया व तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत उत्तम यश मिळवले याचा अभिमान वाटतो. दहावी, बारावीची वर्षे हा आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारा कालावधी आहे. धाडस करत यश मिळवण्याचा प्रयत्न करा. शिक्षणासाठी पर्याय उपलब्ध आहेत. आवडीचे क्षेत्र, शैक्षणिक कल चाचणीच्या माध्यमातून करियर करण्यास प्राधान्य द्यावे.
अंजली जाधव, अनुजा थोरात, प्राची डोंगरे, आकांक्षा फडतरे, विशाल निकम, धनश्री जाधव, प्रणाली कांबळे या गुणवंत विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचे या वेळी भाषण झाले.
किरण पाटील, तुकाराम जाधव, गणपत भोंग, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. तर उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी आभार मानले.
मुख्याध्यापक विकास फलफले, चंद्रकांत कोकाटे, गणेश घोरपडे, उपमुख्याध्यापक केशव बनसोडे, रामहरी लोखंडे, प्रा. रवींद्र साबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.