शेतकरी विरोधी कायदे समजून घेण्यासाठी ऑनलाईन शिबीर संपन्न
महाबुलेटीन न्यूज / आनंद कांबळे
जुन्नर : भारतात लॉकडाऊन सुरु होऊन तीन महिने झाले सर्वजण उद्योग व्यवसाय ठप्प असतांना मातीत राबणारा शेतकरी हा एकमेव काम करत होता. शेतकरी संकटात असतांना राज्यात जो राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातही किसान पुत्रांनी शेतकरी विरोधी कायदे समजून घेण्यसाठी ऑनलाईन शिबीर आयोजित केले.
किसानपुत्र आंदोलनाचे पहिले ऑनलाईन राज्यस्तरीय शिबीर पार पडले. याशिबिरात महराष्ट्राच्या विविध विभागातून मोठ्या प्रमाणत किसानपुत्र उपस्थित होते. ९ ऑगस्ट २०२० रोजी सुरु झालेले शिबिरात शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी सखोल चर्चा व मार्गदर्शन झाले. लॉकडाऊन कालावधीत १००० पेक्षा अधिका शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केली पण त्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. शेतकरी आत्महत्या करतो पण ही परिस्थिती का उदभवली यांच्या मुळावर जाऊन विचार व्हावा, यासाठी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर दि. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान चाललेले १ ले ऑनलाईन शिबिराची शनिवारी सांगता झाली.
या शिबीराचे उद्घाटन चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी केले. तर समारोप आंदोलनाचे प्रणेते जेष्ठ पत्रकार आणि शेतकरी प्रश्नांचे गाढे अभ्यासक अमर हबीब सर यांनी केला.
देशातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या आणि आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या घटनांमागे केवळ समाजवादी, कालबाह्य शेतकरी विरोधी कायदेच कसे जबाबदार आहेत आणि ते पूर्णपणे रद्द करणे का आवश्यक आहे. यावर आधारीत या शिबिरात डॉ.विकास सुकाळे (नांदेड) यांनी सिलिंग कायदा, एॅड.भूषण पाटील (औरंगाबाद) आवश्यक वस्तू कायदा, नंदकुमार ऊगले (नाशिक)जमिन अधिग्रहण कायदा, एॅड.महेश गजेंद्रगडकर (पुणे) शेतकरी विरोधी घटना दुरुस्त्या तर संदीप रोडे (वरूड, अमरावती) यांनी कायदे रद्द करून घेण्यासाठी किसानपुत्र आंदोलन या विषयांवर शिबिरार्थींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
‘मी किसानपुत्र-सहभाग आणि जबाबदारी’ ही भूमिका विश्र्वास सुर्यवंशी (पुणे), तुषार भगत (शिरूर,पुणे), दीपक नारे (टेंभूरडोह, नागपूर), गणेश राठोड (पुणे), संदीप धावडे दहीगावकर (वर्धा) यांनी स्पष्ट केली. शिबिरात महराष्ट्राच्या विविध ठिकाणावरून किसानपुत्र उपस्थित होते त्यात पुरुष व महिलांचा देखील सहभाग होता. वक्तांचा सखोल अभ्यास आणि प्रत्येक किसानपुत्र उस्फुर्तपणे आपले प्रश्न विचारत असे. सरकारने एक पाऊल पुढे टाकले त्यांचे स्वागत परंतु कायदा रद्द करणे अत्यंत गरजेचे आहे.
अमर हबीब सर यांनी समारोपीय मार्गदर्शनातून आंदोलनात नवऊर्जा निर्माण केली. हा सहवेदनेचा लढा आहे. आपण कोणाच्या बाजूने आहोत हे आधी आपल्याला ठरवावं लागेल. बळी घेणाऱ्यांच्या की बळी जाणाऱ्यांच्या? कारण सरकार शब्दांचा खेळ करून जनतेच्या शोषणाला हातभार लावत असते. शेतकरी आणि स्त्री या दोघांच्याच हातावर पृथ्वीचा गोल तोलला गेला आहे. हेच खरे सर्जक असून सगळ्याच धर्म, जाती पंथात यांचेच सर्वाधिक शोषण होत आहे. आपले आंदोलन म्हणजे सर्जकांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. जाती-धर्माच्या बाता करणाऱ्यांसाठी हे आंदोलन नसून वर्गवादी आणि वर्णवादी विचारसरणीला येथे अजिबात थारा नाही. हे आंदोलन केवळ सर्जकांच्या स्वातंत्र्यासाठी असून शेतकरी समस्यांच्या मुळावरच घाव घालण्याचे आवाहन करते.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील शेतकरीपुत्रांनी एकत्रीत येऊन बदललेल्या काळातील ही स्वातंत्र्याची लढाई नव्या तंत्रज्ञानाने आणि हुशारीने लढायची आहे. याबाबतही सरांनी समर्पक दाखल्यातून दिशा स्पष्ट केली.
यासाठी ‘शेतकरी विरोधी कायदे’ या पुस्तिकेचे समजून वाचन करणे, दर सोमवारी ‘शेतकरी विरोधी कायदे रद्द करा’ असे आवाहन करणारी पोस्ट नियमित आपल्या वाॅट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणे, १९ मार्चला ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग (उपवास)’ आणि १८ जूनला शेतकरी पारतंत्र्य दिन पाळून शक्य त्यारितीने आंदोलनाच्या भूमिकेविषयी जनजागृती करून प्रचार व प्रसारास हातभार लावणे, ‘शेतकरी विरोधी कायदे’ या पुस्तिका मिळवून भेट देणे किंवा वाटप करणे, आंदोलनात सहभागी ज्या शेतकरी पुत्रांनी स्वयंप्रेरणेने जे शक्य असेल ते करून आंदोलनाचा हेतू साध्य करण्यासाठी सहभाग द्यावा, असे विविध मार्ग सरांनी सुचित केले.
कारण ही संघटना नाही किंवा पक्ष नाही त्यामुळे येथे कोणी नेता नाही आणि कोणताही आदेश नाही. ही सहवेदनेने चालणारी आणि स्वप्रेरणेने कृती करायला लावणारी सर्जकाच्या स्वातंत्र्याची अभिनव लढाई आहे. या आंदोलनातील शेतकरीपुत्र स्वतंत्र आणि केवळ मानवतावादी आहेत म्हणूनच ते आंदोलनाचा भाग आहेत. याप्रसंगी सरांनी अवलंबी समाज निर्माण करायचा की स्वतंत्र समाज ? हा आत्मचिंतन करायला भाग पाडणारा प्रश्र्न उपस्थित केला.
रोज सायं.५ ते ६.३० या वेळेत पार पडलेल्या या यशस्वी शिबिरात सहभागी शिबिरार्थींनींनी वेळोवेळी आपापल्या प्रश्नांचे आणि शंकांचे तज्ञांकडून निरसन करून घेतले. उपस्थित शिबिरार्थी किसानपुत्रांना लवकरच प्रमाणपत्र देण्यात येईल.
असलम सय्यद आणि मयूर बागूल (पुणे) यांनी या आॅनलाईन शिबिराचे कौतुकास्पद संचालन केले. शेतकरी स्वातंत्र्यासाठी किसानपुत्र मुळावर घाव घालण्याचे काम करत राहणार हा संकल्प आणि त्यासाठी सर्व किसानपुत्र कटिबद्ध असतील असा ठाम निश्चय झाला.
——–