Saturday, August 30, 2025
Latest:
कोरोनापुणे

या विशेष अटींवर केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश

अटींचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विशिष्ट अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. शासनाचे आदेश दिनांक 25/06/2020 अन्वये केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी व शर्तींचे अधीन परवानगी दिली आहे.
 पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्रात, नगरपंचायत, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, तसेच छावणी परिषद हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रामध्ये केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्यूटी पार्लर चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून दिनांक 28/06/2020 पासून पुढील आदेशा पावेतो सकाळी 9  ते सायंकाळी 5 पर्यंत चालू ठेवण्यास जिल्हाधिकारी राम यांनी परवानगी दिली आहे.
केवळ निवडक सेवा जसे की केस कापणे, केसाला रंग देणे, वैकस्सींग थ्रेडिंग इत्यादीला परवानगी असेल परंतु त्वचेशी संबंधित सेवांना सध्या परवानगी नाही. सदर बाबी दुकानात स्पष्टपणे दर्शविल्या जाव्यात. कर्मचा-यांनी हातमोजे, अॅप्रॉन आणि मास्क, सैनिटायझर इ. चा समावेश असलेले संरक्षक साधने वापरणे आवश्यक आहे.
प्रत्येक सेवेनंतर खुर्ची स्वच्छ / निर्जंतूक करणे आवश्यक आहे. तसेच दुकानातील संपूर्ण क्षेत्र आणि जमीन पृष्ठभाग/फरशी प्रत्येक 2 तासांनी स्वच्छ व निर्जंतूक करण्यात यावेत.
टॉवेल्स, नॅपकिन्स यांचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावता येईल, अशा प्रकारच्या टॉवेल्स, नॅपकिन्सचा वापर करण्यात यावा. तसेच वापरुन झाल्यावर विल्हेवाट न लावता येण्याजोग्या उपकरणांचे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करावे.
सेवा देणारा व सेवा घेणारा सोडून इतर व्यक्तीमध्ये 3 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील.
मास्क, रूमाल नाका तोंडाला झाकून ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्यक आहे. तसेच दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश, साबण व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधनकारक राहील.
ग्राहकांना केवळ अपॉईंटमेंट घेऊनच येण्यास कळवावे व ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही, याची सलून मालकांनी दक्षता घ्यावी.
प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांनी वरिल प्रमाणे घ्यावयाच्या दक्षता याबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरुपात लावण्यात यावी.
अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यात येईल. या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!