राजगुरुनगरमध्ये साजरी झाली गुरुपौर्णिमा

राजगुरूनगर : येथील भीमा नदी तीरावरील दत्त मंदिरात श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावाने व उत्साहात साजरा झाला. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून साजरे करण्यात आले.
सकाळी आठ वाजता अॅड. गणेश होनराव यांचे हस्ते सपत्नीक मूर्तीस अभिषेक व महापूजा करण्यात आली. दुपारी दत्त भजनी मंडळ, राजगुरुनगर यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी गुरुपूजन श्रींची सामुदायिक आरती होऊन अॅड. गणेश होनराव यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी राजगुरुनगर व परिसरातील दत्त भक्तांनी सोहळ्याचा आणि गुरू दर्शनाचा लाभ घेतला. मंडळाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी, नथुराम तनपुरे, प्रभाकर जाधव, हनुमंत सैद, शिवाजी सावंत, अजित डोळस, रवि सांडभोर, माणिक तनपुरे, लक्ष्मण कहाणे, शरद चोपडे, मंदार पिसाळ, आदींनी उत्सवाचे नियोजन केले. फुलांची सजावट उत्तम ढोरे व विद्युत रोषणाई नितीन थिगळे यांनी केली. धार्मिक कार्यक्रमांचे पौराहीत्य वसंत खेडकर यांनी केले.