प्रतिबंधित गावात नाकारला प्रवेश ; महिलेने घेतले विष!
पोलीस-नागरिक वादाचे पर्यवसान महिलेच्या मृत्यूत
महाबुलेटिन नेटवर्क
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं. १ कोरोनामुळे गाव प्रतिबंधित म्हणून जाहीर केले. भाजीविक्रीसाठी बाहेर गेलेल्या महिलेला सायंकाळी पुन्हा गावात प्रवेशास पोलिसांनी मज्जाव केला. यात वादावादी झाली. वाद पेटला. या वादातून महिलेने विषारी औषध घेतले. यात महिलेचा मृत्यू झाला.
उंब्रज नंबर १ या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे गावाला कंटेंनमेंट झोन जाहीर केले. गावात विनापरवाना प्रवेश करण्यास पोलिसांनी मज्जाव केला. या वादातून अनुजा रोहिदास शिंगोटे या महिलेने पोलिसांसोबत झालेल्या वादातून पोलिसांसमोरच विष घेतले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला.
तालुक्यात कोरोनाचा समूह संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कंटेंनमेंट झोन करण्यात येत आहेत. ओतुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उंब्रज नं. १ या गावात पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी कंटेंनमेंट झोन करुन गावात प्रवेश व बाहेर पडण्यास बंदी केली आहे .
मंगळवारी अनुजा रोहिदास शिंगोटे व कुटुंब टेम्पोतून भाजीपाला विक्रीसाठी घेऊन बाहेर पडले. सायंकाळच्या सुमारास गावात प्रवेश करत असताना प्रवेश करण्यावरुन पोलीस व शिंगोटे कुटुंबांत वाद झाला. वाद विकोपाला जाऊन अनुजा शिंगोटे यांनी गावातील नागरिक व पोलिसांसमोर विषारी औषध घेतले. त्यावेळी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गावातील तपास नाक्यावर पोलीस व ग्रामस्थ शिंगोटे कुटुंबियांना समजविण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी वाद झाला. रोहिदास शिंगोटे हे विषारी औषध घेऊन आले. त्यावेळी झटापटीत औषध खाली पडले. त्यांच्या पत्नी अनुजा शिंगोटे यांनी हे विषारी औषध सर्वांसमक्ष घेतले. वादातून झालेला प्रकार महिलेच्या जीवावर बेतला.