महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : मित्राच्या मदतीने मुलीने केला जन्मदात्या आईचा खून! चंदननगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल
महाबुलेटीन न्यूज
पुणे : वडगाव शेरी येथे राहणार्या एका महिलेचा तिच्या १८ वर्षांच्या मुलीनेच आपल्या मित्रांच्या सहाय्याने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढल्यानंतर हा प्रकार आईला कळू नये म्हणून त्या मुलीने हे अघोरी कृत्य केले आहे. मंगल संजय गोखले (वय ४५, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी, पुणे) असे या मुलीचे नाव असून तिच्यासह विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) यांना चंदननगर पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.
आरोपी योशिताने मित्रांच्या सहाय्याने आपली आई मंगल यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले. हे आईला समजू नये म्हणून तिची मित्रांच्या सहाय्याने हत्या करण्याचा कट रचला. त्या प्रमाणे मित्र यश शितोळे घरी बोलावून तिची आई झोपलेली असतानाच त्याला हातोडीने तिच्या डोक्यात प्रहार करावयास लावले. यावेळी आई ओरडल्यास आवाज बाहेर जाऊ नये म्हणून योशिताने आपल्या आईचे तोंड स्कार्फने दाबून धरले. ती मृत झाल्याची खात्री केल्यानंतर बाथरूममध्ये घसरून पडल्याचा बनाव करून हे गंभीर गुन्ह्याचे कृत्य लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांना या प्रकरणाचा संशय आला. त्यांनी आपला संशय पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी खुनाची कबुली दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माने अधिक तपास करीत आहेत.