महाबुलेटीन न्यूज । कार्तिकी यात्रा विशेष… आळंदीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून दर्शनबारीची पाहणी… ● कोरोनाचे पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचे आवाहन..
महाबुलेटीन न्यूज । कार्तिकी यात्रा विशेष…
आळंदीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून दर्शनबारीची पाहणी…
● कोरोनाचे पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचे आवाहन..
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहाळ्यांतर्गत कार्तिकी यात्रा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१ या कलावधीत होत आहे. यानिमित्त लाखो भाविक आळंदीत येणार असून भाविक, नागरिक व मंदिर परिसर सुरक्षिततेसाठी आळंदीत विविध उपाय योजना पोलिस प्रशासनाकडून केल्या जात आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आळंदीस सद्दिच्छा भेट देवून बुधवारी ( दि. २४ ) पाहणी केली. या दरम्यान येथील पोलिस प्रशासनाचे कामाची माहिती घेत त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.
यावेळी पोलीस आयुक्त मंचक इप्पर, दिघीचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, अॅड विकास ढगे पाटील, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, व्यवस्थापक माऊली वीर, पोलिस निरीक्षक रमेश पाटील, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदींसह पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
आळंदी कार्तिकी यात्रा काळात भाविक, नागरिकांच्या सुरक्षिततेसह आरोग्याची काळजी घेण्यासाठी आळंदीत यात्रा काळात विविध उपाय योजना करण्याचे काम आळंदी पोलिस, आळंदी नगरपरिषद, महसूल व आरोग्य सेवा प्रशासन तसेच आळंदी देवस्थान यांचे वतीने सुरू आहे. भाविक, नागरिकांच्या आरोग्यासस सुरक्षिततेस प्राधान्य देवून कार्तिकी यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाचे वतीने विशेष दक्षता घेण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे येथील पोलिस प्रशासनाने तयारी सुरू केली असून येथील मठ, मंदिरे, धर्मशाळा यांना दक्षता घेण्यासाठी नोटिसा बजवून भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी उपाय योजना तसेच प्रशासनांचे सूचनावर कार्यवाही करण्यास सुचविले आहे. यात कोरोनाचे पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटायझरचा वापर, मुख पट्टीचा वापर करण्यास सांगितले आहे. कोरोनाचा प्रभाव वाढू नये याची विशेष दक्षता घेतली जात आहे. आलेल्या वारकरी यांच्या नोंदी ठेवण्यास प्रथमच आदेशीत करण्यात आले आहे.
आळंदीत यात्रा काळात अत्यावश्यक सेवेतील तसेच वारकरी यांची वाहने वगळून इतर वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी आदेश जारी करण्यात आला असून आळंदीला येणार्या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात येता आहे. यात्रा काळात इतर वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.
शहरात विविध चौकात पोलिस मदत केंद्र, यात्रेच्या हालचालीवर नजर ठेवण्यास सी.सी. कॅमेरे बसविण्यात येत असून यात्रा काळात यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यात्रा नियंत्रण कक्ष आळंदी पोलिस ठाण्यात विकसित करण्यात आले असून यात्रा काळातील सर्व हालचालीवर पोलिसांची २४ तास बारीक नजर राहणार आहे. आळंदीत पी.ए.सी. सिस्टिम द्वारे अनाउंसिंग केले जाणार असून येथील सूचनावर कार्यवाही तात्काळ होण्याचे दृस्टीने यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. भाविकांना विविध माहिती व सूचना मिळाव्यात यासाठी लक्षवेधी फलक ठिक ठिकाणी लावण्यात येणार आहे. यात्रेत दहशतवाद तसेच घातपात सारख्या कारवाया विरोधी बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात ठेवण्यात येणार आहे. यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले आहे. यात्रा काळात संपर्क कायम राहावा यासाठी यात्रा परिसरात मोटार सायकल पेट्रोलिंग करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कामकाज केले आहे.
● आळंदीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होणार
आळंदी यात्रा काळात पोलिस प्रशासनांकडून १६४ पोलिस अधिकारी, ११३४ पोलिस अमलदार, ६९६ होम गार्डस, ३ एस.आर.पी. कंपनी, १ एन.डी.आर.एफ. तुकडी, २ बी.डी.डी.एस. पथक असा मोठा बंदोबस्त तैनात होणार आहे.
आळंदीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिस प्रशासनाचे कामकाजाचा आढावा घेत माहिती घेतली. आळंदी मंदिर व परिसर तसेच भक्ति सोपान पूल, तात्पुरती दर्शन बारी मंडपाची पाहणी केली. दरम्यान आळंदी मंदिरात आळंदी देवस्थान तर्फे कृष्ण प्रकाश यांचा सत्कार करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
००००