Friday, April 18, 2025
Latest:
अध्यात्मिकखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रयात्राविशेष

कार्तिकी एकादशी हरिनाम गजरात साजरी

कार्तिकी एकादशी हरिनाम गजरात साजरी

महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी मंगळवारी ( दि. ३० ) तीर्थक्षेत्री लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने हरिनाम गजरात साजरी झाली. बुधवारी ( दि. १ ) श्री’चा रथोत्सव गोपाळपुरातून निघणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.

एकादशीला पहाटपूजेला प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, प्रांत विक्रांत चव्हाण, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कु-हाडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, राहुल चिताळकर पाटील, सचिन पाचुंदे, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, नगरसेवक सचिन गिलबिले, सागर भोसले, सचिन काळे, नगरसेविका प्रतिमा गोगावले, प्रमिला रहाणे, सुनीता रंधवे, रुख्मिणी कांबळे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, श्रींचे सेवक बाळासाहेब रनदिवे चोपदार, राजाभाऊ रंधवे चोपदार, रामभाऊ रंधवे चोपदार, मानकरी योगिराज कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, योगेश आरु, आळंदी पोलिस स्टेशनचे प्रभारी ज्ञानेश्वर साबळे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, संजय रनदिवे चोपदार, सोमनाथ लवंगे, श्रीकांत लवांडे, ज्ञानेश्वर पोंधे यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, मानकरी, आळंदी ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

दर्शनबारीतील मानाचे वारकरी शेषराव आडे आणि गंगूबाई आडे

कार्तिकी पहाटच्या पूजेसाठी रात्री मंदिर स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांचे मार्गदर्शनात देवस्थांनचे नियंत्रणात सेवकांनी स्वच्छता करीत असतानाच दरम्यान पहाट पूजेचे तयारीने मंदिरात वेग घेतला. मंदिरात स्वच्छतेची सेवा झाली. दरम्यान घंटानाद झाला. यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने शासनाने परवानगी देत सोहळा शासन निर्देशांचे पालन करीत होत आहे. या कार्तिकी यात्रेत आळंदीत भाविकांची गर्दी वाढली. सोहळ्यातील पहाट पूजेस भाविक, मानकरी, वारकरी, पदाधिकारी यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. पहाटे घंटानाद झाल्यानंतर २ च्या सुमारास पवमान अभिषेक व ११ ब्रम्ह्वृंदांचे उपस्थितीत वेदमंत्र जयघोष प्रसाद जोशी यांचे पौरोहित्यात झाला. परंपरेने भीमा वाघमारे यांचे नियंत्रणात मंदिरात सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने भक्तिमय वातावरण निर्मिती केली. मंदिरात पहाट पूजे दरम्यान आकर्षक फुलांची सजावट पै. मानसिंग पाचुंदकर यांचे वतीने करण्यात आली. मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई तसेच परिसरात लक्षवेधी रंगावली रेखाटण्यात आल्या. विद्युत रोषणाई , रंगोली आणि लक्षवेधी फुलांची आकर्षक सजावटीने यावर्षी मंदिराचे वैभव वाढले.

संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पूजा ११ ब्रम्ह्वृंदांच्या वेद मंत्र जयघोषात पूजा बांधली. श्रींचे पहाटपूजेचे वेदमंत्र जयघोषात पठन पौरोहित्य मंडळाने केले. श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यात पहाट पूजेत पौरोहित्य प्रसाद जोशी, निखिल प्रसादे, यशोदीप जोशी, आनंद जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, मंदार जोशी, श्रीरंग तुर्की, संदीप कुलकर्णी, अवदूत गांधी, विजय कुलकर्णी यांनी वेद मंत्र जय घोष करीत रूद्राभिषेक व पवमान अभिषेक प्रथा प्रारंपरेचे पालन करीत केला.

माऊलींचे रूप आकर्षक सजल्याने पहावेसे वाटत राहिले. यावेळी पूजेत दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर आदींचा वापर झाला. लक्षवेधी मेखला, शाल, तुळशीचा हार, सोनेरी मुकुट समाधीला आकर्षक लाभला. पुजारी प्रसाद जोशी यांनी मंत्रपठन केले. माऊलींच्या आरती नंतर मानकरी, सेवेकऱ्यांना आणि मान्यवरांना प्रमुख विश्वस्त योगेश देसाई विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांचे हस्ते नारळ प्रसाद झाला. यावर्षी दर्शनबारीतील मानाचे वारकरी शेषराव आडे आणि गंगूबाई आडे या परतवाडी तांडा, परतूर जिल्हा जालना येथील मानकरी वारकरी जोडप्यास मान मिळाला. श्रींचे गाभा-यात मानाचे वारकरी यांना प्रमुख विश्वस्त योगेश देसाई व विश्वस्त अॅड विकास ढगे पाटील यांचे हस्ते सन्मान देण्यात आला.

माऊलींचे आरती नंतर समाधी दर्शनासाठी पासधारकांना प्रथम दर्शनास सोडण्यात आले. त्याच वेळी दर्शन बारीतील भाविकांनाही दर्शनास सोडण्यात आले. पूजे नंतर भाविकांना शृंचे दर्शन पंखा मंडपातून थेट होत होते. यामुळे दर्शनास फार वेळ लागला नाही. कमी वेळेत जास्त भाविक दर्शन घेवून पुढे निघत होते. एकादशी दिनी माउली मंदिरात दुपारी फराळचा महानैवेद्य झाला. त्यानंतर पालखी नगरप्रदक्षीनेस दुपारी महाद्वारातून बाहेर निघाली. मंदिरातून नगर प्रदक्षिणेला नाम गजरात प्रदक्षिनामार्गे, हजेरी मारुती मंदिरात आरती, अभंग, हरिनाम गजर व प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, नितिन साळुके, अभि पवळे, सागर रानवडे यांचे सह नवशिवशक्ती मित्र मंडळाने भाविकांचे सुलभ दर्शनाचे नियोजन केले. भाविक, वारकरी यांनी हरिनामाचा जयघोष करीत प्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. हजेरी मारुती मंदिरात परंपरेचे अभंग गायन, कीर्तन झाले. मंदिरात प्रदक्षिणा झाल्यानंतर धूपारती झाली. रात्री हरिजागर झाला. मंदिरात सुरक्षेच्या साठी विशेष दक्षता घेण्यात आल्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.

आळंदीत कार्तिकी एकादशी व माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री पांडुरंगराय, श्री पुंडलिकराय व संत नामदेवराय यांचे वैभवी पादुका पालखी यावर्षी थेट पायी पालखी सोहळ्याने परंपरांचे पालन करीत आल्या. तत्पूर्वी थोरल्या पादुका येथे विधीतज्ञ विष्णु तापकीर यांनी सोहळ्याचे स्वागत केले. आळंदीत परंपरेने पादुका पालखी सोहळ्याचे आगमन व स्वागत करण्यात आले. हजेरी मारुती मंदिरात पांडुरंगराय पादुकांचे दर्शनासही भाविक, नागरिकांनी गर्दी केली. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव , नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष आदित्य घुंडरे यांनी भाविकांना सेवासुविधा देण्यास विशेष काळजी घेतली.

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्‍वर ॥१॥
बुधवारी (दि.१) आळंदीत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथोत्सवासाठी मंदिरातून गोपाळपुर येथे खांद्यावर येईल. त्यानंतर गोपाळपुरा येथून रथोत्सवास सुरुवात होणार आहे. मंदिरात एकादशी प्रथापरंपरांचे पालन करीत साजरी झाली.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!