जुन्नर येथील शिंगोटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश : खासदार डॉ. कोल्हे यांचे प्रयत्नांना यश
जुन्नर तालुक्यातील रुग्णांना सवलतीत उपचार

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
नारायणगाव : जुन्नर येथील शिंगोटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत झाला असून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील रुग्णांना सवलतीत उपचाराची सोय निर्माण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर शहरातील शिंगोटे मल्टिस्पेश्यालिटी हे सुसज्ज हॉस्पिटल रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत होते. परंतु या रुग्णालयात येणारे रुग्ण प्रामुख्याने आदिवासी भागातील असल्याने त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्यावर सवलतीत उपचार करता यावे यासाठी शिंगोटे मल्टिस्पेश्यालिटी हॉस्पिटलच्यावतीने महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांच्या पॅनेलवरील यादीत समावेश करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज बराच काळ प्रलंबित असल्याने त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सहकार्य करण्याची विनंती केली होती.
तालुक्यातील गरीब आदिवासी बांधवांवर सवलतीत उपचार उपलब्ध व्हावे यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून शिंगोटे मल्टिस्पेश्यालिटी हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या रुग्णालयाचा समावेश दोन्ही जनआरोग्य योजनांत करण्यात आला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील गरीबांना विशेषतः आदिवासी क्षेत्रातील बांधवांना विविध आजारांवरील उपचारांसाठी सवलतीचा लाभ मिळणार आहे.