इंग्रज अधिकारी फाकड्याचा वादग्रस्त बोर्ड शिवप्रेमींनी व संघटनांनी काढला
महाबुलेटिन न्युज / तुषार वहिले
वडगाव मावळ : तहसील कार्यालय इमारतीच्या आवारात लावलेला वादग्रस्त बोर्ड शिवप्रेमींनी व संघटनांनी काढला असून त्याठिकाणी नवीन बोर्ड लावण्यात आला आहे.
येथील तहसील कार्यालय आवारात एक वादग्रस्त बोर्ड होता, तो कधी लावला गेला होता याबाबत सर्वजण अनभिज्ञ आहेत. दिनांक २१ ऑगस्ट रोजी काही शिवप्रेमींच्या हे लक्षात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडगाव मावळ येथे ६ जाने ई. स. १७७९ रोजी इंग्रज व मराठा सैन्यात लढाई झाली होती, त्यात मराठा सैनिकांनी इंग्रजांना पराभूत करून तह करण्यास भाग पाडले होते. यात मराठ्यांचे नेतृत्व शूर सेनानी महादजी शिंदे यांनी केले होते. प्रत्यक्ष लढाई जिंकण्याच्या चार दिवस अगोदर कार्ला येथे इंग्रजी सैन्य अधिकारी स्टुअर्ड फाकडा उर्फ ईस्टुर फाकडा हा मराठी सैनिकांकडून मारला गेला. पण ह्या इंग्रज फाकडाचे थडगे वडगाव तहसिल कार्यालयात कधी पासून आले हे कोणीच सांगू शकत नाही.
काही वर्षांपूर्वी या थडग्याला बकरी मारून गावजेवन देण्याची प्रथा गावकऱ्यांनी बंद पाडली. पंरतु येथील बोर्डावर इंग्रजी सैन्य अधिकाऱ्याचा शूरवीर व स्वर्गवासी असा उल्लेख केलेला आढळला व शिवप्रेमी व इतर संघटनांनी त्याला विरोध दाखवल्यावर हा बोर्ड काढण्यात आला आणि हा खरा इतिहास समोर येण्यासाठी शिववंदना ग्रुप मावळ यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर. व्ही. चाटे यांना निवेदन देऊन नवीन बोर्ड लावण्यात आला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष दिनेश ठोंबरे, सरपंच दत्तात्रय पडवळ, उमेश गावडे, संजय शिंदे आदी उपस्थित होते.
——-