इंदापूर विचार मंथन परिवाराच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी ( दि.१ ) येथील इंदापूर विचार मंथन परिवाराच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळवणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
राधिका रेसिडेन्सी क्लब मध्ये हा कार्यक्रम पार पडला. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व्याख्यान देताना नितीन भोसले म्हणाले की, “दलित पददलित, कष्टक-यांमधील लढवय्या व्यक्तिमत्वांना अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे अमर केले. सामान्यांना परिवर्तनासाठी लढावयास शिकवले. त्यांच्यासारखी लोकोत्तर व्यक्तीमत्वे ही कोणा एका जातीधर्माची नसतात. तर ती संपूर्ण समाजाची असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव सा-या समाजाने केला पाहीजे. ‘इंदापूर विचार विचार मंथन’ने
ते अभिनंदनीय पाऊल उचलले”.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव आरडे म्हणाले की, “पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर कष्टक-यांच्या हातावर तरली आहे हे वास्तव सत्य सांगणा-या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. कारण सामान्यांमध्ये बदल घडवण्याची ताकद त्यांच्या कार्यात आहे.”
यावेळी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणा-या पंचशील बाळासाहेब सरवदे, स्नेहा संभाजी पवार, अंजली सुनील जाधव या विद्यार्थ्यांचा धनंजय कळमकर, काकासाहेब मांढरे, कैलास पवार, दीपक खिलारे या पत्रकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पत्रकार सुरेश मिसाळ, सुधाकर बोराटे व शैलेश काटे यांच्या हस्ते व्याख्याते नितिन भोसले यांचा सत्कारकरण्यात आला. शरद झोळ यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी बाळासाहेब सरवदे, शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, विशाल चव्हाण, हमीदभाई आत्तार, वसंत आरडे, माऊली नाचन, प्रकाश आरडे, हनुमंत कांबळे, हनुमंत मोरे, वाल्मिक खानेवाले, घाडगे, वीरेंद्र गलांडे यांच्यासह राधिका विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राधिका रेसिडेन्सी क्लबच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यामधील हॉलचे काम पूर्ण झाले आहे. त्या हॉलमध्ये घेतलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. लोकाशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या अमर कार्याचा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा त्यामध्ये यथोचित सन्मान इंदापूर विचार मंथन परिवाराचे प्रमुख अरविंद वाघ यांनी केला, अशी उपस्थितांची सामुहिक प्रतिक्रिया होती.