Friday, April 18, 2025
Latest:
कोरोनाजुन्नरपुणे जिल्हाप्रशासकीयविशेषसण-उत्सव

गणपती आरती, विसर्जन व मिरवणूक तसेच मोहरम आगमनसाठी फक्त ५ जणांना परवानगी

 

नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई : पोलीस अधीक्षक संदीप पाटील
गणेशोत्सव व मोहरम शांतता कमिटी आढावा बैठक संपन्न

 

महाबुलेटीन न्यूज / आनंद कांबळे
जुन्नर : कोरोना महामारी मुळे यावर्षी सार्वजनिक गणपती उत्सव तसेच मोहरम निमित्ताने आगमन व विसर्जन मिरवणुकांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे परवानगी मिळणार नसून गणपती आगमन, दररोजची आरती व विसर्जन मिरवणूक याकरिता फक्त ५ कार्यकर्त्यांना परवानगी राहणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई सक्तीने होणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

आगामी गणेशोत्सव व मोहरम निमित्ताने शांतता कमिटी आढावा बैठकीचे आयोजन जुन्नर मध्ये करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार अतुल बेनके, नगराध्यक्ष श्याम पांडे , तहसीलदार हनुमंत कोळेकर, उपाधीक्षक दीपाली खन्ना यांच्यासह शांतता समिती सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी व हिंदू – मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. संदीप पाटील म्हणाले, शतकातून एकदा महामारी येते ती यावेळी आलेली आहे. या महामारी मुळे प्रत्येकाला आपली जीवनपद्धती बदलावी लागते. सण-उत्सव यावर मर्यादा येतात.

गणेशोत्सवात मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत :
गणेशोत्सव हा एक सामाजिक उत्सव असून महामारी मुळे बारा बलुतेदार, हातावर पोट असणारे अनेकजण आर्थिक संकटात आहेत अशा खऱ्या गरजूंना गणेशोत्सव मंडळांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदत करावी व खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश या उत्सवातून प्रत्यक्ष कृतीतून गणेश मंडळांनी दाखवून द्यावा.

कोरोनामुळे गणपती आगमन, विसर्जन तसेच मोहरमच्या मिरवणुकीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही. मोहरम निमित्ताने मुस्लिम समाज सार्वजनिक स्वरूपात त्यांना भोजन कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही. सामाजिक सलोखा कायम राखीत परिस्थितीनुसार वागण्याची भूमिका हिंदू – मुस्लिम समाज बांधवांनी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आयुष प्रसाद म्हणाले, हिंदू-मुस्लीम समाजाचे सण हे एकमेकांना दाखविण्याकरिता नसून त्रास देण्यासाठी नाही. सण उत्सवात सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. सण उत्सवामध्ये शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई कडकपणे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी देत ‘एक गाव एक गणपती’ याचा विचार गांभीर्याने होणे आवश्यक आहे. परंतु या उत्सवा करिता ग्रामनिधी खर्च करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्यामधील अहंकार बाजूला ठेवून एकमेकांशी स्पर्धा न करता एकत्रितपणे तसेच एकोप्याने सण-उत्सव आपापल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करण्याचे आवाहन केले.

गणेश मंडळांनी रक्तदान व आरोग्य शिबिरे घ्यावीत :
गणेशोत्सवामध्ये सामाजिक काम म्हणून प्लाझ्मा दान, व्हेंटिलेटर या सुविधा देण्याची घोषणा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून होत आहे. परंतु या दोन्ही सुविधा गुंतागुंतीच्या व महागडे असल्याने अशा घोषणा न करिता रक्तदान , आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार अतुल बेनके म्हणाले, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे अधीन राहून हिंदू मुस्लिम बांधवांनी आपले सण साजरे करावे. नियमांचे पालन जे करणार नाहीत, अशा बेशिस्त लोकांवर प्रशासनाकडून निश्चित कारवाई होणार असून नागरिकांच्या आरोग्याचा काळजी करिता यावेळी सार्वजनिकपणे उत्सव साजरे करू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोरोनामुळे अनेक मंदिरे, प्रार्थना स्थळे बंद आहेत ती खुली करण्यात यावी. जुन्नर मध्ये अनेक गणेश मंडळे यावर्षी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणार असून प्रशासनास सहकार्य करणार आहेत. ३६ वर्षानंतर सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम हे पुन्हा एकत्र येणार आहेत. कोरोनामुळे मुस्लिम समाजाचे सर्व सहकार्य प्रशासनास राहणार आहे. सार्वजनिक उत्सवावर मर्यादा न घालता रोज होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, आदी सूचना या बैठकीत नगरसेवक फिरोज पठाण, भाऊ कुंभार, गणेश इंगवले, मधुकर काजळे, नंदकुमार तांबोळी, दीपक परदेशी यांनी मांडल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपाली खन्ना यांनी केले. सूत्रसंचालन विलास कडलक यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी मानले. शांतता समिती बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना आमदार अतुल बेनके व उपस्थित मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!