दुनिया अनमोल रत्नांची : लखलख चंदेरी तेजाचा हिरा
नमस्कार,
आज आपण नवग्रहातील शेवटचा परंतु अतिशय मौल्यवान रत्नाची माहिती घेऊ. तो म्हणजे हिरा. आपल्याकडे हिरेखरेदीबाबत साशंकता फार मोठ्या प्रमाणात दिसते.हिरा आपल्याला लाभेल का ? तो खरंच खरा असेल का ? खुपच महाग असतो हिरा आपल्याला परवडेल का ? असे नाना प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. आणि केवळ फसवले जाऊ या भितीपोटी इच्छा असून देखील आपण हिरेखरेदीपासून वंचित राहतो. आज आपण जाणून घेऊयात अशीच काही या रत्नाबद्दल ची रोचक तथ्ये…..!
हिरा म्हणजे काय ? तर १००% कार्बन म्हणजे हिरा. विश्वास बसत नाही ना कार्बन तर काळा असतो मग हिरा कसा काय इतका चमकतो असा प्रश्न आपणास पडला असेल. जमिनीत ३००० डिग्री तापमानात हिरा तयार होतो. सुरवातीला कच्चा स्वरुपात असणारा हिरा पैलू पाडुन चमकदार केला जातो. जगभरात जर्मनी, बेल्झीयम, इटली, जर्मनी, साऊथ अफ्रिका येथे फार मोठ्या प्रमाणावर हिरे मिळतात. एक वेळ होती भारतातही हिरे मिळायचे. भारतात गोवळकोंडा येथे फार मोठ्या प्रमाणावर हिरे मिळायचे.परंतु कालानुरूप या खाणी काही दशकापुर्वी बंद झाल्या.उत्पन्न कमी झाल्याने. आजही जगभरात गोवळकोंडा माईनचा हिरा म्हटलं की, विशेष कुतूहलाने पाहीलं जातं कारण जगप्रसिद्ध कोहिनुर हिरा याच मातीतील. कोहिनुर चा विषय निघालाच आहे तर आणखी एक गमतीशीर गोष्ट सांगतो. कोहिनूर हिरा खुप काही चमकदार वैगेरे नव्हता हं.पण फक्त आकाराने मोठा असल्याकारणाने तो जगप्रसिद्ध होता.कारण त्याकाळात एवढा मोठा हिरा सापडणं म्हणजे एक आश्चर्य होते. असो,
हिरा ओळखावा कसा ? पारदर्शकता हा त्याचा मुळ गुणधर्म. आणि या एकाच कसोटीवर हिरा तपासून पहावा. काठीण्य वैगेरे या सगळ्या दुय्यम गोष्टी येतात.पुर्वी हिऱ्याचं जे कटिंग ( पैलू पाडण्याचं काम ) अतिशय सामान्य होतं पण हल्ली त्यात ती सुबकता आलीय ती पाहीली की, आपण या व्यावसायात आहोत याचा अभिमान वाटतो. उघड्या डोळ्यांनी हिऱ्यातील दोष, वैगुण्य दिसत नाहीत. परंतू 10 MM मँग्नीफाईनग्लास मधून ( आम्ही व्यावसायिक मंडळी याला लूप असे म्हणतो.) आपण पाहू शकतो. हिऱ्याची वैशिष्ट्ये म्हणजे सोन्यात ज्या प्रमाणे प्रतवारी असते २२ कँ, २३ कँ, २४ कँ, अशा प्रकारची प्रतवारी आपणांस हिऱ्यात पहायला मिळत नाही. हिऱ्यात 4 सी महत्त्वाचे असतात ते पुढील प्रमाणे १) कट २) कँरेट ३) क्लिअँरिटी आणि सगळ्यात महत्त्वाचे ४) कलर या चार गोष्टींवर या रत्नाची पारख केली जाते. हिऱ्यामध्ये कटींग हा अतिशय महत्वाचा भाग मानला जातो.त्यावर त्याचे पैलू ठरतात.त्यानंतर कँरेट म्हणजे वजन सोनं जसे ग्रँममध्ये मोजले जाते तसे हिराच नव्हे तर सर्व रत्ने कँरेट मध्ये मोजली जातात. क्लिअँरिटी हा देखील अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो हिऱ्यामध्ये IF, VVS1, VVS2, VS1, VS2, SI1, SI2 I1, I2, I3 अशा भरपूर प्रकारच्या क्लिअँरिटी असतात.चौथा भाग म्हणजे कलर. रंग हि एकमेव अशी गोष्ट आहे ज्यावरून कळते की आपला हिरा सर्वगुणसंपन्न आहे की, नाही. रंग म्हणजे लाल, हिरवा, गुलाबी वैगेरे नाही हं तर हिऱ्यामधील रंग D,E,F,G पासून सुरू होतात ते अगदी Z पर्यंत.
मग आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर कोणता हिरा घ्यावा. तर यातील सर्वोत्तम हिरा हा D कलर आणि IF क्लिअँरिटी चा मानला जातो. याची आजची बाजारभावाप्रमाणे किंमत १६ लक्ष रुपयांपर्यंत येते १ कँरेट वजनाची. बाकी इतरंही गटवारी येते त्यात पण मग त्या प्रमाणात किमती कमी अधिक होतात.परंतू सर्वसाधारण पणे G कलर आणि VVS क्लिअँरिटी चे हिरे सर्वोत्तम असतात खरेदी साठी देखील आणि किमतीच्या हिशोबाने देखील.हे माझं वैयक्तिक मत आहे. हि झाली रत्नशास्त्राधारीत हिरा या रत्नाबाबतची जुजबी माहिती. हि जितकी रोचक आहे तितकीच रोचक माहिती हिऱ्याच्या प्रभावाची देखील आहे.
कलाकार, राजकीय नेते, वकील, व्यावसायिक मंडळी हिऱ्याकडे पटकन आकर्षित होतात. कारण आकर्षित करणं हा हा हिऱ्याचा मुलभुत गुणधर्म आहे.शुक्राचे रत्न म्हणजे हिरा असा आपल्या ज्योतिषशास्त्रानूसार सांगितले जाते.आणि शुक्र हा पैसा, प्रसिध्दी, यश यांना आकर्षित करणारा ग्रह मानला जातो. ज्यांची रास तूळ आणि व्रुषभ आहे अशा मंडळींना गुरुजी आवश्य हिरा वापरण्याचा सल्ला देतात.एकप्रकारे वलयांकित करणारे हे रत्न आहे. याशिवाय सौंदर्य आणि हिरा याचा देखील अतिशय जवळचा संबंध आहे. मोहिनी घालणारं हे रत्न आहे.हिरा वापरल्याने त्वचेची नितळता वाढते.आणि म्हणून स्त्रीया हिरेखरेदीस जास्त प्राधान्य देतात. हिऱ्याच्या वापराने बुध्दीची तल्लखता वाढते.आत्मविश्वास वाढतो.
अगदी जाता आठवले म्हणून सांगतो रोम या देशात असा समज आहे की, ” भगवंताच्या डोळ्यातून आलेला अश्रूचा थेंब म्हणजे हिरा होय ! ” इतके श्रेष्ठ असणारे हे रत्न गुंतवणूकीचा एक समर्थ पर्याय आहे. सोन्याच्या किमतीत ज्या पध्दतीने चढ उतार येतात.तसे हिऱ्याचे नसते हिऱ्याच्या किमती स्थिर राहतात किंवा वाढतात.पण कमी कधीच होत नाही.हिऱ्याच्या दागिण्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मजुरीसहीत बदलून दिले जातात आणि ते चालू भावात. हिऱ्याचे प्रमाणपत्र देखील असते. परंतु हे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त संस्थेचे असावे. ( IGI किंवा GIA ) स्थानिक संस्थेचे प्रमाणपत्र घेऊ नये. हल्ली लेझर इन्सक्रिप्शन करून हा प्रमाणपत्राचा नंबर हिऱ्यावर लिहिला जातो. या रत्नाबद्दल सांगण्यासारखे पुष्कळ आहे.पण मलाही शब्दमर्यादा आहेत.तुम्हाला आणखी काहीही शंका असतील तर नक्कीच मला फोन करा.
आणि हो नवत्नातील रत्ने जरी आज संपली असली तरी जगात अशी अनेक विलोभनीय रत्ने आहेत ज्यांची नावे देखील आपणास ठावूक नसतात अशा विविध रंगी रत्नांसोबत आपली ही लेखमाला अशीच चालू राहिल हे आश्वासन देऊन आज थांबतो.
श्री गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरूनगर
९६५७३२२१०२ / ९८२२७९९८९८