देववृक्षाचे संत नगरी सोलापूर जिल्ह्यात रोपण
देववृक्षाचे संत नगरी सोलापूर जिल्ह्यात रोपण
महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्रीक्षेत्र आळंदीतील अजानवृक्षाचे श्रीक्षेत्र अरण आणि स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट मध्ये मोक्षदा एकादशी तसेच गीता जयंतीचे औचित्य साधून देववृक्षाचे संत नगरी सोलापूर जिल्ह्यात हरिनाम गजरात रोपण करण्यात आले.
बायोस्फिअर्स पुणे, सत्संग फाउंडेशन, श्री संत शिरोमणी सावता माळी संजीवन समाधी मंदिर अरण सोलापूर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट यांच्या वतीने मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीचे औचित्य साधून श्री क्षेत्र अरण (श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर) आणि स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट (श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर परिसर) या ठिकाणी शांभवी-अजानवृक्षाचे विधिवत पूजन करून पवित्र तीर्थक्षेत्रात रोपण करण्यात आले. अजानवृक्षाचे रोप हे आळंदी येथील सिद्धबेट या पुरातन शिवपीठातील (ज्ञानदेवांची लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजान वृक्षापासून तयार करण्यात आले आहे. जणू त्याचीच प्रतिकृती या कार्यक्रमाप्रसंगी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज ह.भ.प. दादामहाराज वसेकर, ह.भ.प. अंकुश महाराज वसेकर, ह.भ.प. सत्यभामा वसेकर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, विलास कोरे, बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन अनिल पुणेकर, सत्संग फाउंडेशनचे आनंद मुळे, राजेंद्र मांडवकर, स्थानिक ग्रामस्थ अनिल कोळी, सुमित वाघमारे, गणेश इंगळे, राहुल देसाई, वैभव जाधव, दोन्ही मंदिर समितीचे सदस्य, भाविक उपस्थित होते. यावेळी पर्यावरणीय व अध्यात्मिक दृष्टीकोनातून वृक्षाच्या बाबतीत डॉ. सचिन पुणेकर लिखित सचित्र माहिती असलेल्या हरित पत्रिकेचे वाटप करण्यात आले.
संत साहित्याचा अभ्यास केला असता श्री संत ज्ञानेश्वर माऊली व अजानवृक्ष यांचे दृढ नाते लक्षात येते. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी देखील समाधिस्त होण्यापूर्वी जो दंड रोवला होता. तो देखील याच सिद्धबेटातील अजानवृक्षाचा होता. यावरून माऊलींची संजीवन समाधी व अजानवृक्ष हे एक समीकरणच झाले आहे. गेली सात शतका पेक्षा जास्त वर्षे हा ज्ञानवृक्ष जनसामान्यांना व अभ्यासकांना प्रेरित करीत आहे. आत्मशक्ती देत आहे. तसेच नाथ, दत्त आणि वारकरी संप्रदयात ह्या देव-वृक्षाला विशेष महत्व दिले आहे. गोरक्षवल्ली, योगवल्ली, योगिनी, शांभवी, अजानवृक्ष, निधी, पूर्णधन, अंजानवृक्ष अश्या अनेक नावांनी हा वृक्ष परिचित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देववृक्षाचे रोपण करण्यात आले.
बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधीवर असलेला ज्ञानवृक्ष-अजानवृक्ष सर्वदूर (योग्य त्या ठिकाणी) पोहचवणे हाच आहे. औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ज्ञानवृक्षाच्या संवर्धनासाठी तसेच आपल्या संस्कृती, परंपरेमधील महत्वाच्या वृक्षाबाबत जनमानसात, भाविकांत जाण वाढावी, या ज्ञानवृक्षाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, जनमानसात योग्यती सकारात्मकता यावी या उद्देशाने अजानवृक्ष आता सर्वदूर पोहचात आहे. आजपर्यंत या हरित चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे, मंदिरे, अध्यात्मिक-केंद्रे, संजीवन समाधी, विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या आवारात याचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे. महादेवाला आणि भगवान विष्णूला अतंत्य प्रिय असणाऱ्या शांभवी या ज्ञानवृक्षाचे मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती दिनी रोपण करण्यात आले.
००००