खेड तालुक्याचा कोहिनुर हिरा अनंतात विलीन… उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड यांच्यावर चाकण येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार… शासकीय इतमामात अंत्यविधी न झाल्याने माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली खंत…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुक्यातील कडाचीवाडीचे सुपुत्र व गोंदिया जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन ) व पुण्याचे माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त राहुल हरिश्चंद्र खांडेभराड ( वय 40 वर्षे ) यांच्यावर आज सायंकाळी 6 वाजता चाकण येथील चक्रेश्वर मंदिर स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे शुक्रवारी ( दि. 15 जानेवारी ) रात्री 9.30. वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे. मागील अडीच महिन्यांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. 21 नोव्हेंबर पासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल त्यांच्यावर काळाने अचानक घाला घातला.
खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कार वेळी भोसरीचे आमदार विलास लांडे पाटील, उद्योजक राहुल गोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड, ग्राहक संरक्षण सेनेचे उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव यांनी श्रद्धांजली वाहिली.
भोसरीचे आमदार विलासराव लांडे यांनी राहुल खांडेभराड हे शासकीय सेवेत असल्याने हा अंत्यविधी शासकीय इमामात न झाल्याने खंत व्यक्त केली.
यावेळी शिवसेना खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, राष्ट्रवादीचे नेते प्रकाश खराबी, मनोज खांडेभराड यांच्यासह खेड पंचक्रोशीतील नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग, त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.