लोणावळ्यात १२ तासात दोघांचा खून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टीसह गणेश नायडू या युवकाची हत्या
लोणावळ्यात १२ तासात दोघांचा खून शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टीसह गणेश नायडू या युवकाची हत्या
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
लोणावळा : शिवसेनेचे मावळ तालुका संस्थापक प्रमुख कै. उमेश शेट्टी यांचे पुत्र व शिवसेनेचे माजी लोणावळा शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर तीन गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली. तर दुसर्या घटनेत लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे गणेश नायडू या युवकाचाही रविवारी रात्री दहाच्या सुमारास धारदार शस्त्राने खून करण्यात आला या दोन्ही घटनेमुळे लोणावळा शहर हादरले आहे. दोन्ही घटना या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेट्टी हे आज सकाळी त्यांच्या घरा खाली असलेल्या येवले चहा समोर त्यांच्या गाडीवर चहा पिताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर मारेकर्यांनी तीन गोळ्या घालून धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. यामध्ये डोक्यात दोन व छातीत गोळी लागली असून, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल शेट्टी यांना तत्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील परमार हॉस्पिटल मध्ये दाखल केले, दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भर सकाळी लोणावळ्यातील जयचंद चौकात ही घटना घडल्याने लोणावळा शहर संपूर्णपणे हादरले आहे. ३० ते ३५ वर्षापूर्वी राहुल शेट्टी यांचे वडिल उमेश शेट्टी यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज राहुल यांची निर्घुण हत्या झाली आहे. राहुल यांच्या पश्चात शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्या मार्गाने मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. राहुल यांना आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचे संकेत मिळाल्यावर राहुल शेट्टी यांनी यासंदर्भात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली होती.
दुसरी घटना रविवारी दसऱ्याच्या रात्री दहाच्या सुमारास लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे घडली. गणेश नायडू या युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असून, याघटनेत खुनी हल्ला करणाराही गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा एक हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी हल्लेखोरावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या दोन्ही घटनांचा लोणावळा शहर पोलीस तपास करत आरोपींचा शोध घेत आहेत.