राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी उद्या मराठा क्रांती मोर्चाचे आक्रोश आंदोलन
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे.
इंदापूर : उद्या (दि.२ ऑक्टोबर) म. गांधी जयंती दिवशी सकाळी साडेदहा वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील निवासस्थानी ‘आक्रोश आंदोलना’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. नानाविध आंदोलनांच्या माध्यमातून त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. स्थगिती उठवली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ठिकठिकाणी आमदार, मंत्र्यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन सुरु करण्यात आले आहे. इंदापूरात या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आंदोलनाचा एक भाग म्हणून उद्या राज्यमंत्री भरणे यांच्या निवासस्थानी आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
या पूर्वी मराठा समाजाने आपल्या मागण्यांबाबत शासनासह सर्व संबंधितांना अनेकवेळा निवेदने, प्रसिध्दीपत्रके दिली, मात्र त्याचा काही ही उपयोग झाला नाही. त्यामुळे हे आंदोलन थेटपणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
—