दहीहंडीला मानवी मनो-याऐवजी वृक्षसाखळी
संकल्प प्रतिष्ठानचा वेगळा उपक्रम, १२०० वृक्षांची लागवड

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : कोरोनाच्या महामारीमुळे मानवी साखळीचा मनोरा करुन, दहिहंडी फोडता येणार नाही, हे स्पष्ट झाल्याने इंदापूर मधील संकल्प प्रतिष्ठानच्या गोविंदांनी यंदा पर्यावरणपूरक अशी वृक्षसाखळी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार शहर परिसरात बाराशे वृक्षांची लागवड करण्याच्या त्यांच्या उदीष्टाजवळ ते पोहोचले आहेत.
अक्षय सूर्यवंशी, इम्रान पठाण, यश भंडारी, अकिब शेख, प्रसाद भंडारी, सौरव वीर, शुभम धारुरकर, साहिल बागवान, प्रवीण अनपट, सुरज महामुनी अशी हा संकल्प पूर्ण करणा-या ‘संकल्प प्रतिष्ठान’च्या शिलेदारांची नावे आहेत.
या उपक्रमासंदर्भात माहिती देताना अक्षय सूर्यवंशी यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारीमुळे गर्दीच्या सर्व उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. दहिहंडीचा जल्लोष निर्माण करणारा उत्सव देखील त्याला अपवाद नाही. शरीरात प्रतिकारशक्तीचा अभाव असल्याने लोक कोरोनाला बळी पडत आहेत. पर्यावरण उत्तम राहिले तर लोकांमधील प्रतिकारशक्ती वाढू शकते. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांची संख्या वाढवणे महत्वाचे आहे. त्यामुळे आमच्या प्रतिष्ठानने वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला.
दि. १ ते १२ ऑगस्ट या कालावधीत बाराशे वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. प्रत्येक गोविंदाने किमान पाच झाडे लावण्याचा निर्धार केला आहे, आम्ही आमच्या उद्दीष्टापर्यंत पोहोचलो आहोत, अशी माहिती देवून, इतर दहिहंडी संघ, प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी ही असेच उपक्रम राबवावेत, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले.