एमआयडीसीतील कंपन्यांच्या सहकार्याने रुग्णालयांसाठी स्वतंत्र मॉडेल राबविणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
आळंदी : ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांसाठी एक स्वतंत्र मॉडेल राबविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. आळंदी येथील इंद्रायणी कॅन्सर रुग्णालयात आयोजित पीपीई किट्स प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून डॉ. कोल्हे त्यांच्या ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात पीपीई किट्स, मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. कोल्हे यांच्या प्रयत्नांतून ह्युंदाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीच्या सहकार्याने ३०० पी पी ई किट्स उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी १०० किट्स आळंदी येथील इंद्रायणी कॅन्सर रुग्णालयास देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
या प्रसंगी ह्युंदाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीचे संचालक श्री. डी. वाय. किम, महाव्यवस्थापक श्री. एन. सी. चोई, मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी अभिजित पाचपोर, वरिष्ठ व्यवस्थापक (एच.आर.) प्रकाश धोंडगे, इंडस्ट्रीयल हेल्थ अॅण्ड सेफ्टी पुणे विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे, इंद्रायणी रुग्णालयाचे मुख्य विश्वस्त डॉ. संजय देशमुख, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. अनिल पत्की, डॉ. भूषण झाडे, डॉ. नितीन गोसावी, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, युवक तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, माजी सभापती बाळशेठ ठाकूर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल हरपळे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटाने आपल्याला जागे केले असून आरोग्यसेवा सक्षम करण्याची गरज लक्षात आणून दिली आहे. प्रत्येक बाबतीत शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळे एमआयडीसीतील कंपन्यांच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा निर्माण करुन आरोग्यसेवेचे एक मॉडेल शिरूर लोकसभा मतदारसंघात राबवणार आहोत असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर आपणही आपली काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या सूचनांचे जबाबदारीने पालन केले पाहिजे असे आवाहनही डॉ. कोल्हे यांनी केले.
इंद्रायणी कॅन्सर रुग्णालय कॅन्सरग्रस्तांना अतिशय चांगल्या सुविधा देत असून रुग्णांवर विनामूल्य उपचार करीत असल्याचा उल्लेख करुन डॉ. कोल्हे म्हणाले की, रस्ते, पाणी, वीज अशा पायाभूत सुविधा देणं ही आपली कर्तव्य आहेत मात्र अशाप्रकारे समाजासाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे. या भावनेतूनच इंद्रायणी रुग्णालयाप्रमाणेच ग्रामीण रुग्णालयाला पीपीई किट्स देण्यासाठी ह्युंदाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीने सहकार्य केले आहे. त्यामुळे या कंपनी व्यवस्थापनालाही डॉ. कोल्हे यांनी धन्यवाद दिले.