पुण्यात २३ जुलैनंतर पुन्हा लॉकडाउन नाही : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. आज लॉकडाउनचा सातवा दिवस आहे.
या लॉकडाऊन मध्ये पहिले ५ दिवस अत्यंत कडक अंमल बजावणी करण्यात आली. त्यानंतर या नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. २३ जुलैपासून या पुढे पुण्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन असणार नाही, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारी लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचं पालन नागरिकांनां कराव लागणार आहे, असं नवलकिशोर राम यांनी म्हटले आहे.
रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडू देणार नाही. तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजअखेर प्रशासनाकडून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत, असंही नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे.