खराबवाडीतील ग्रामस्थांना अनंतकृपा पतसंस्थेच्या वतीने आर्सेनिक अल्बम होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त गोळ्या
महाबुलेटिन नेटवर्क
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील अनंतकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने गावातील ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
मागील आठवड्यात गावात १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून एकाचा मृत्यू झाल्याने ही बाब गावकऱ्यांनी गांभीर्याने घेतली आहे. कोरोना संसर्ग साखळी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी २ जुलै पासून एक आठवड्यासाठी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवला आहे. खबरदारी म्हणून गावाने हा निर्णय घेतला असून अनंतकृपा पतसंस्थेने ग्रामस्थांची प्रतिकार शक्ती ( IMMUNITY POWER ) वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप केले आहे.
आर्सेनिक आल्बम या गोळ्यांचा डोस तीन महिन्यासाठी असून महिन्यातून केवळ तीन दिवस आनोशेपोटी गोळ्या घ्यायच्या आहेत. या गोळ्या घेण्यापूर्वी अर्धा तास अगोदर व अर्धा नंतर पोटात जेवण, पाणी, चहा, कॉफी घेऊ नये. तसेच डोस चालू असताना कांदा, लसूण, कॉफी व मांसाहाराचे सेवन करू नये, गरोदर माता व तीन वर्षाच्या आतील बालकांना या गोळ्या देऊ नयेत, असे डॉ. लक्ष्मण राऊत यांनी यावेळी सांगितले. तसेच गावामध्ये रिक्षा फिरवून डॉ. राऊत यांनी प्रबोधनही केले आहे.
यावेळी माऊली क्लिनिकचे डॉ. लक्ष्मण राऊत, अनंतकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक खराबी, सचिव शिवाजी खराबी, संचालक सोपानराव खराबी, भरत बिरदवडे, पोलीस पाटील किरण किर्ते, शंकर कड, संदीप कड, राजेंद्र कड, संतोष वाळुंज, बाळासाहेब कड, रामभाऊ खराबी, अशोक खराबी, बबन कड, नंदाराम जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान कोरोनाची साखळी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी तोंडावर मास्क बांधावे, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन डॉ. राऊत, सरपंच अनिताताई जंबुकर, माजी उपसरपंच प्रकाशभाऊ खराबी, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, पोलीस पाटील किरण किर्ते, तलाठी आचारी भाऊसाहेब, पतसंस्था व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.