योग्य काळजी घेतल्यास कोरोनापासून जीवितास धोका नाही : डॉ. मोहन वाघ ● उरुळी कांचन मध्ये रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीर संपन्न
उरुळी कांचन मध्ये रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीर संपन्न
“कोरोना संसर्गावर प्रभावी उपाय योजना” या विषयावर मार्गदर्शन
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन : कोरोना हा संसर्ग मानव निर्मित असुन तो विषाणू आपण स्वच्छतेची, सामाजिक अंतर पाळण्याची व मास्क वापरण्याची योग्य काळजी घेवून वागलो तर आपल्या जीवितास धोका करू शकत नाही, असे प्रतिपादन कोरोना उपचार तज्ञ डॉ. मोहन वाघ यांनी केले. उरुळी कांचन येथे विविध संस्थांच्या वतीने आयोजित रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे उद्घाटनानंतर “कोरोना संसर्गावर प्रभावी उपाय योजना” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन हवेलीचे जेष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन व सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांचे हस्ते करण्यात आले.
या शिबिरात २२८ जणांनी (२१८ पुरुष व १० महिला) रक्तदान व १८ जणांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी रक्त नमुना तपासणीसाठी ब्लड बँकेकडे देत या महामारीच्या व लॉकडाऊनच्या काळात आयोजकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून रक्त बाटल्या संकलित करण्याचा उच्चांक प्रस्थापित केला.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, उपसरपंच संचिता कांचन, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबासाहेब कांचन, प्राचार्य बबनराव दिवेकर, स.पो.नि नितीन शिंदे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, मिलिंद जगताप, अजिंक्य कांचन, जयदीप जाधव, अमोल भोसले, संतोष चौधरी, किरण वांझे, शैलेश गायकवाड यांचेसह सर्व निमंत्रक संस्थांचे कार्यकर्ते, आधार ब्लड बँकेचे डॉक्टर व सहकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे राजू बडेकर या युवकाने सलग १०१ वे रक्तदान केल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला.
ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, उरुळी कांचन ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन, हवेली तालुका पत्रकार संघ, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, उरुळी कांचन पोलीस चौकी, महात्मा गांधी सर्वोदय संघ आणि आधार ब्लड बँक, धनकवडी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले होते. उच्चांकी रक्त बाटल्या संकलित होवून शिबिर यशस्वी झाले.
०००००