Friday, May 9, 2025
Latest:
उद्योग विश्वयशोगाथा

यशोगाथा : येलवाडीच्या युवकाची उद्योग क्षेत्रात भरारी, शून्यातून विश्व निर्माण..

भारतासह अमेरिकेत डेट्रॉईट मध्ये अत्याधुनिक रिसॉर्टची उभारणी..

हनुमंत देवकर ( महाबुलेटीन न्यूज नेटवर्क )
चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रात येलवाडी येथील युवक विजय बोत्रे यांनी अल्पावधीत ठसा उमटवला आहे. पारंपरिक व्यवसायाला फाटा देऊन स्थानिक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा, हा ध्यास घेऊन बोत्रे यांनी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधील कर्मचारी व कामगारांना चोवीस तास कंपनी पोच पद्धतीने नास्ता व जेवण पुरवणारी अत्याधुनिक पद्धतींचा वापर केलेली अधिक रिसॉर्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीची स्थापन केली. कंपनीचे अत्याधुनिक किचन खालूंब्रे ( ता.खेड ) येथे सुरु केले. आज या कंपनीची वार्षिक उलाढाल चार ते पाच कोटीपर्यंत गेली आहे. त्याचबरोबर ओझारा डायनिंग हॉल या हॉटेलचीही निर्मिती केली.

शेतकरी कुटुंबातील युवक, घरची परिस्थिती बेताची असल्याने श्री. बोत्रे यांनी कसेबसे दहावी पर्यंत शिक्षण घेतले. सन १९९१ मध्ये त्यांनी वाळूचा धंदा सुरु केला. त्यात अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी हा धंदा बंद करून निगडी प्राधिकरणात हार्डवेअरचे दुकान सुरु केले. मात्र याही व्यवसायात त्यांना रस न वाटल्याने पिंपरी-चिंचवड परिसरात भाग्यश्री डायनिंग हॉल या नावाने त्यांनी हॉटेल सुरु केले. हॉटेल चालवत असताना चाकण परिसरात औद्योगिक वसाहत वाढते आहे, हे त्यांनी हेरले, त्यामुळे या वसाहतीतील कंपन्यांतील कामगार व कर्मचारी यांना चहा, नाष्टा व जेवण यांची सुविधा देण्यासाठी त्यांनी २००४ मध्ये खालूंब्रे गावात एक एकर जमिनीवर अद्यावत शेड उभारून अधिक रिसॉर्ट इंडिया प्रा. लि. ची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी महिंद्रा व्हेइकल्स लि., केहीन फाय, लुकास, टीव्हीएस, बडवे ऑटो, पानसे ऑटोकॉम्प, कला जनसेट, थाई सुमित व इतर मोठ्या उद्योगांना जेवण, नाश्ता व चहाची २४ तास सेवा उपलब्ध करून दिली. कंपनीमध्ये सध्या दीडशे कामगार आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे.

सौर उर्जेवर जेवण बनविले जाते. फळभाज्या कापण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर केला जातो. अत्याधुनिक यंत्र सामुग्रीमुळे शंभर किलो तांदळाचा वीस मिनिटांत चांगला भात होतो. वीस मिनिटात २००० कप चहा तयार होतो. दररोज वीस हजाराहून जास्त चपात्या बनविल्या जातात. खाद्य पदार्थ ने-आण करण्यासाठी स्थानिक तरुणांना रोजगार देऊन त्यांची वाहने भाड्याने घेतली आहेत. दररोज चार ते पाच हजार लोकांसाठी जेवण व इतर खाद्य पदार्थ बनविले जातात. यामध्ये दाक्षिणात्य, उत्तर भारतीय, महाराष्ट्रीयन, थाई, स्पॅनिश, जापनीज, अमेरिकन आदी प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ बनविले जातात. यासाठी आचारी काम करणाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण दिले जाते. हे आचारी बंगाल, गढवाल, बिहार तसेच महाराष्ट्रातील आहेत. कंपनीला दररोज पाचशे लिटर दूध लागते. हे दूध पिशव्यांमधील न वापरता स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतले जाते.

याबाबत श्री. बोत्रे म्हणाले कि, व्यवस्थापक, सुपरवायझर असले तरी मी व माझी पत्नी साधना आम्ही व्यवस्थापन पाहतो. या व्यवसायाची सुरुवात माझे मित्र शिवाजी वर्पे, संजय माळी, बाळासाहेब काशीद, बापूसाहेब भेगडे यांच्या सहकार्याने केली. कंपनीत स्वच्छतेला अधिक महत्व दिले जाते. उत्कृष्ट प्रतीचा भाजीपाला, फळभाज्या, कडधान्ये, डाळी खरेदी केल्या जातात. खरकाट्यामुळे अस्वच्छता होऊ नये, म्हणून कंपनीजवळ बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून एक शेगडी बारा तास चालून इंधनाची बचत केली जाते.

मागील तीन वर्षांपूर्वी बोत्रे यांनी परदेशी कंपन्यांची गरज ओळखून अमेरिकेतील डेट्रॉईट शहरात हि केटरींग कंपनीची स्थापना केली असून ते स्वतः तेथील व्यवस्थापन पाहतात. शिवाय परदेशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच अधिक रिसॉर्ट लगत ओझारा डायनिंग हॉल या नावाने हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेऊनही या युवकाचे पाय जमिनीवर आहेत.

2 thoughts on “यशोगाथा : येलवाडीच्या युवकाची उद्योग क्षेत्रात भरारी, शून्यातून विश्व निर्माण..

  • Balaji Bhurale

    Nice sir i Interested

    Reply
  • A wonderful efforts in social media to reach to people, educate them and give information and updates on day to day happenings.
    I sincerely appreciate your contribution towards society 👍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!