विधिमंडळाच्या तीन समित्यांवर आमदार दिलीप मोहिते पाटलांची नियुक्ती
तीन-तीन समित्या देऊन पक्षाने त्यांच्यावर असणारा विश्वास केला त्रिगुणीत
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : संपूर्ण जगावर पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटाचे सावट व त्याचे भरीव पडसाद महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळावरही उमटल्याशिवाय राहिले नाहीत. यामुळे गेली वर्षभर विधिमंडळातील समित्या व त्यांचे अध्यक्ष्य तसेच सदस्य पदांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. परंतु आता कोरोना संकटाचा प्रभाव कमी झाल्यावर नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून विधिमंडळाच्या एकूण २४ समित्यांच्या अध्यक्ष तसेच सदस्य पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील सुप्त गुणांना न्याय देऊन व तालुक्यातील जनतेशी त्यांची जोडली गेलेली नाळ; हे नाते अबाधित टिकून राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर तीन-तीन समित्यांच्या सदस्यपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने विधिमंडळाची महत्वाची समिती म्हणजे अंदाज समिती, मराठी भाषा समिती व ग्रंथालय समिती अशा महत्वाच्या समित्यांचा समावेश आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास आणि टाकलेली जबाबदारी ते समर्पकपणे सार्थ करतील असा सूर नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहे. विधिमंडळाच्या तीन समित्यांच्या सदस्यपदी आमदार मोहिते पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
आमदार मोहिते पाटील यांची विधिमंडळ समित्यांवर निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत केलेल्या मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी उपस्थित जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.