Friday, April 18, 2025
Latest:
गुन्हेगारीपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकमहाराष्ट्रविशेषहवेली

वाहने कंपनीत भाडेतत्त्वावर लावण्याचे आमिष दाखवून परराज्यात वाहनांची विक्री करणारी टोळी जेरबंद, तीन आरोपींना अटक…

वाहने कंपनीत भाडेतत्त्वावर लावण्याचे आमिष दाखवून परराज्यात वाहनांची विक्री करणारी टोळी जेरबंद, तीन आरोपींना अटक…

महाबुलेटीन न्यूज
उरुळी कांचन ( सुनील जगताप ) : कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो म्हणून चारचाकी गाडीच्या मालकास आमिष दाखवून तिच वाहने दुसऱ्या राज्यात नेऊन विक्री करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट ६ ने जेरबंद केले आहे. 

मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय ३८, रा. फ्लॅट नं ४०५, युनिटी टॉवर, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे), ओंकार ज्ञानदेव वाटाणे, (वय २८, रा. मु. पो. हिंगणी बेर्डी, ता. दौंड, जि. पुणे), मोहम्मद मुजीब मोहम्मद बसीर उद्दीन, (वय ४८, रा. ए, संतोषनगर, पाणी टाकी जवळ, संतोषनगर, हैद्राबाद, राज्य तेलंगणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ कोटी २२ लाख रुपयांच्या १३ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ओला कंपनीमध्ये स्वतःची स्विफ्ट डिझायर कार चालवितात. ओला कंपनीमध्ये कार चालवित असताना त्यांची ओळख मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद सय्यद गिलानी याच्याशी झाली होती. त्याने तो नोएडा, उत्तर प्रदेश येथील युनायटेड एस एफ सी सर्व्हिस नावाची नेटवर्क टॉवरची कंपनीमध्ये नोकरीस असल्याचे सांगून त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो, असे सांगून फिर्यादीस अमिष दाखवून साडे चार महिन्याच्या कालावधीमध्ये फिर्यादीकडून त्याची व इतरांची अशी एकूण २८ चारचाकी वाहने ताब्यात घेतली होती.

त्यानुसार जी वाहने भाडेतत्वावर घेतली होती त्या वाहनांची जीपीएस यंत्रणा काढून टाकली व वाहने घेवून फिर्यादीची फसवणूक करून तो फरार झाला असल्याने फिर्यादीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गुन्हे शाखा युनिट ६ चे पथक गस्त घालीत असताना पोलीस नाईक कानिफनाथ कारखेले व नितीन मुंढे यांना एका खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, चारचाकी गाडी विकण्यासाठी पुणे येथे बस स्टैंड परिसरामध्ये विक्रीकरिता येणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफसह दौंड, पुणे येथे जावून बस स्टैंड परिसरामध्ये सापळा रचून वरील तीन आरोपींना चारचाकी गाडीसह ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील विजयनगर, ता. बिलोली, जि. नांदेड व बालकोंडा, जि. निजामाबाद, तेलंगणा येथून एकूण १ कोटी २२ लाख रुपये किंमतीच्या ४ इनोव्हा क्रिस्टा, १ मारुती सूझूकी इर्टिगा, २ स्विफ्ट डिझायर, ४ आयशर, २ अशोक लेलंड अशी एकूण १३ चारचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!