Saturday, August 30, 2025
Latest:
खेडजुन्नरपुणे जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रयात्राविशेष

तमाशा…मोजतोय अंतिम घटका !

तमाशा…मोजतोय अंतिम घटका!

शिवाजी आतकरी
महाबुलेटिन न्यूज नेटवर्क

 

उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे यात्रा जत्रांचा हंगाम. गावागावातील यात्रा म्हणजे आनंदाची पर्वणी. यात्रांचा हंगाम आणि तमाशा हे समीकरण. खेड्यातील या यात्रांमध्ये तमाशा हेच मुख्य आकर्षण. संगीतबारीचा आणि ढोलकीफडाच्या तमाशांचे फड गावोगावी दिवस रात्र रंगत असायचे……

तमाशा ही आपल्या लोककलांपैकी एक. पठ्ठे बापूराव, दत्तोबा तांबे शिरोलीकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, चंद्रकांत ढवळपुरीकर,मालती इनामदार, काळू-बाळू, भिका भीमा , रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे कुरवंडीकर, दत्ता महाडिक, अशी अनेक मंडळीनी ही लोककला सांभाळली. या श्रेयनामावलीतील काही या लोककलेचे शिलेदार आणि काही वारसदार.वग सम्राट, तमाशा सम्राट, लेखणीसम्राट,अशा उपाध्या त्यावेळी रासिकांनीच या लोक कलावंतांना दिल्या होत्या. तमाशा लोकप्रियतेच्या शिखरावर होता त्यावेळी.

पूर्वी पारावर तमाशा भरायचा. तमाशा दुपारी(हजेरी) व्हायचा तसा रात्रीही. प्रचंड गर्दीने भरलेल्या पटांगणात तमाशा असायचा. तमाशात गण-गौळण, बतावणी, रंगबाजी, फार्स आणि वग असे पाच प्रकारचे अभिनय असायचे. त्यातील गणाने सुरुवात व्हायची.शाहीर गण गायचा. आणि त्याचे साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवायचे. गण संपला की ढोलकी कडाडायची. ढोलक्याचा परफॉर्मन्स झाला की पायात चाळ बांधून आणि स्टेजच्या पाया पडून नर्तकिंचा नाच सुरू व्हायचा. त्यानंतर सुरु व्हायची गौळण,आणि बाजूला कृष्णाच्या लीला. मग सोंगाड्या स्त्री वेशात मावशी बनून आला की तमाशाला खरा रंग चढायचा. गोपीका दूध, दही, लोण्याचे हंडे घेवून मथुरेला निघू लागल्या की वाटेत पेंद्या/सोंगाड्या त्यांना आडवा आलाच म्हणून समजा. आपल्या द्विअर्थी, कसदार, ग्रामीण शैलीच्या खास विनोदाने हसवून पोट दुखायला लावायचा. त्यानंतर सवालजवाब होत. शृंगारिक लावण्या व्हायच्या. आणि शेवटी तमाशाचा आत्मा म्हणजे वग सुरु व्हायचा. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक कथा नाट्य रूपाने सादर व्हायचे. पहाटेपर्यंत चालणाऱ्या वगाचा शेवट गावकऱ्यानां काहीतरी संदेश देऊन व्हायचा.

काळानुसार तमाशा खूप बदललाय. तमाशा ही एक लोककला. लावणी हा प्राण होता. तर वग हा त्याचा आत्मा होता. तमाशा पाहणारी जशी लोकं होती. तशी तमाशा जगणारी कलाकार मंडळी होती. ही कला जिवंत ठेवण्यासाठी उपाशी पोटी नाचणाऱ्या नर्तकीही होत्या.ताल धरणारे घुंगरु होते. घुंगराना खेळवणारे स्त्री नर्तकिंचे भक्कम पाय होते. गर्भारपोट घेऊन बोर्डावर नाचणारी विठाबाई होती. वारसा पुढे चालविणारे दतोबा तांबे शिरोलीकर यांचे पुत्र कैलास-विलास होते,. मालती इनामदारांचा नितीन होता.आयुष्यभर वगात राजा बनून दिवसा भाकरीला महाग असूनसुद्धा कला जिवंत ठेवण्यासाठी धडपडणारे सोंगाडे होते. पण काळानुसार तमाशाचा ओर्केस्ट्रा झाला. प्रेक्षकानीच त्याचा ओर्केस्ट्रा बनवला. सगळी पंचक्रोशी दणाणून पहाटेपर्यत चालणारा “वग” आता नामशेष होतोय. त्याची जागा आता धिंगाणा घालणाऱ्या आक्राळ विक्राळ गाण्यांनी घेतलीय. ढोलकी, डफ, चौंडक, टाळ, तुणतुणे, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रँगल ही वाद्ये आता तमाशाची सुरवात करण्यापुरतीच राहतील की काय अशी भीती वाटतेय. काळानुसार तमाशा बदलतोय पण तो इतकाही बदलायला नको की त्याचा आत्माच हरवून जावा. आणि खरा खुरा तमाशा जन्माला येणाऱ्या नवीन पिढ्यांना पुस्तकात भेटावा…

खऱ्या अर्थाने मातीतून जन्म झालेल्या आणि कित्येक पिढ्यांनी सांभाळ केलेल्या या लोककलांची आपण बदलांच्या आणि नवीन सुधारणांच्या नावाखाली माती बनवू पाहतोय. कित्येक तमाशा मंडळांच्या राहुट्या कायमच्या बंद पडू लागल्यात. त्या तंबूच्या आतील पोटे कुटुंबासहित उपाशी आहेत. आयुष्यभर या कलेची सेवा करून तमाशा जगलेला खरा कलावंत आज पडक्या घरात बीड़ीचा धूर हवेत सोडून आपण पाहिलेली स्वप्ने जाळून घेत आहे. हे वास्तव आहे.

तमाशा टिकविण्याचा फड मालक प्रयत्न करतात. मात्र रसिकांच्या मागणीनुसार सादरीकरण करावे लागते. वग हा तमाशाचा आत्मा पण तो आता लोक पहात नाहीत. नवीन गाण्यांची फर्माईश होते. तमाशा अलीकडे खूप बदलला मात्र महाराष्ट्राची लोककला आम्ही टिकावणार आहोत. मोहित नारायणगावकर( विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचे नातू) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!