तहसील कार्यालयातील लिपिकास १ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : वाटप झालेल्या जमिनीची नोंद तहसील कार्यालयाच्या विशेष नोंदवहीत करण्यासाठी मागितलेल्या दोन हजार रुपयांच्या लाचेपैकी एक हजार रुपये घेताना इंदापूर तहसील कार्यालयातील लिपिकाला आज ( दि.१० जुलै ) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात पकडले.
नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर ( वय३५ वर्षे )असे या लिपिकाचे नाव आहे. लाच लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, महिला पोलिस शिपाई शिल्पा तुपे, पोलीस कर्मचारी गणेश भापकर, प्रशांत वाळके यांनी ही कामगिरी केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदारास महाराष्ट्र जमिनी महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे जमिनीचे वाटप झाले होते. त्याची नोंद तहसील कार्यालयाच्या विशेष नोंदवहीत करावयाची होती. त्यासाठी संबंधित विभागाचा लिपिक धर्मापुरीकर याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. या बाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज लाचेच्या रकमेपैकी एक हजार रुपये स्वीकारताना धर्मापुरीकर यास सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात पकडले.