तडीपार कुख्यात गुंड पप्पू वाडेकरचा खुन करून फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दोघांना अटक, खेड पोलिसांची कामगिरी
तडीपार कुख्यात गुंड पप्पू वाडेकरचा खुन करून फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दोघांना अटक, खेड पोलिसांची कामगिरी
महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील खेड तालुका राजगुरुनगरमध्ये जुन्या भांडणाच्या राग मनात धरुन कुख्यात गुंड पप्पु ऊर्फ राहुल कल्याण वाडेकर याचा निर्घुण खुन करणार्या प्रकरणाचा उलगडा झाला असून खेड ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे (वय ३१, रा. तिन्हेवाडी रोड, जयगणेश दर्पण सोसायटी, राजगुरुनगर, ता. खेड) आणि बंटी ऊर्फ विजय जगदाळे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मिलिंद विठ्ठल जगदाळे, मयूर विठ्ठल जगदाळे (रा. सातकर स्थळ, ता. खेड, जि. पुणे), सचिन शांताराम पाटणे (रा. थिगळस्थळ, ता. खेड, जि. पुणे), प्रविण ऊर्फ मारुती थिगळे (रा. थिगळ स्थळ, ता. खेड, जि. पुणे), तौसिफ शेख (रा. दोंदे, ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत.
राहुल ऊर्फ पप्पू कल्याण वाडेकर (वय २८, रा. राजगुरुनगर, तडीपारीनंतर वाजेवाडी, ता. शिरुर) याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध कलमांखाली ९ गुन्हे दाखल आहेत. राजगुरुनगरचे माजी उपसरपंच सचिन ऊर्फ पपा भंडलकर यांचा केदारेश्वर मंदिर परिसरात २०११ मध्ये खुन केला होता. पप्पू वाडेकर याला तडीपार करण्यात आले होते.
राजगुरुनगर शहरात वर्चस्वावादामुळे त्याचे मिलिंद जगदाळे व टोळीशी काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. सोमवारी पहाटे होलेवाडी परिसरात पप्पु वाडेकर आला असल्याची माहिती जगदाळे टोळीला मिळाली. त्यानंतर जगदाळे टोळीने त्याच्यावर गोळीबार करुन जखमी केले. त्यानंतर दगडाने चेहरा ठेचून त्याचा खुन करुन पळून गेले. पप्पुचा भाऊ अतुल कल्याण वाडेकर यांनी याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथक राजगुरुनगर परिसरात तपास करीत असताना पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी बंटी जगदाळे हा पुण्याकडे पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार राजगुरुनगर शहरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर जितेद्र गोपाळे हा बरोबर असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी जितेंद्र गोपाळे याला ताब्यात घेतले असून दोघांना अधिक तपासासाठी खेड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, नेताजी गंधारे, सहायक फौजदार राजेंद्र थोरात, हवालदार विक्रम तापकीर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, जनार्धन शेळके, राजू मोमीन, दीपक साबळे, सचिन गायकवाड, पोलीस नाईक मंगेश थिगळे, अजित भुजबळ, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, राजापुरे यांनी केली.
००००