Friday, May 9, 2025
Latest:
इंदापूरराजकीय

स्वीकृत नगरसेवकपदी दादासाहेब सोनवणे

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांची आज ( दि.१४ जुलै ) इंदापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली.
चार महिन्यांच्या कालखंडानंतर व्हिडीयो काॅन्स्फरन्सीद्वारे पार पडलेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत, पीठासन अधिकारी, नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी सोनवणे यांची निवड झाल्याचे जाहिर केले. या पूर्वीचे स्वीकृत नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्या पदासाठी सोनवणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.
समंजस, मनमिळावू व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून परिचित असणारे सोनवणे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे पद मिळाल्याचा विशेष आनंद वाटतो आहे. आजवर सर्वसामान्य लोकांच्या हितास प्राधान्य देवून आपण काम केले आहे. पुढील काळात तसेच काम करु, असे पत्रकारांशी बोलताना सोनवणे यांनी सांगितले.
सोनवणे यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, राजेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल राऊत, प्रा.अशोक मखरे व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!