Saturday, August 30, 2025
Latest:
महाराष्ट्रमुंबईविशेष

सबॉर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात..

 

वीज कंपन्यांना अभियंत्यांच्या आंदोलनाचा इशारा

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : किशोर कराळे
मुंबई : सध्या संपूर्ण राज्यभरात कोविड-१९ सारख्या महामारीने अक्षरशः थैमान घातलेले असून आता तर कोविड चा सामाजिक उद्रेक व संघर्ष सुद्धा सुरु झाला आहे. सर्वत्र अशी कठीण परिस्थिती असतांनाही महावितरण मधील सर्व अभियंते कोविड सेंटर/हॉस्पिटल्स व विलगीकरण कक्ष तसेच सर्वच ग्राहकांना अखंडितपणे वीजपुरवठा करण्याचे काम जीव जोखमेत घालून करीत आहेत. काही अभियंते तर कर्तव्य बजावत असतांना कोरोन ग्रस्त झाले असून, काही अभियंत्यांचा दुर्दैवीरित्या कोविड मुळे अंत झाला आहे. अशी आणीबाणीची परिस्थिती असतांना सुद्धा सर्व अभियंते व एस ई ए संघटना प्रशासनास प्रत्येक गोष्टीत सर्वोतोपरी सहकार्य करीत आहेत, मात्र महावितरण प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असून त्यामुळे अभियंत्यांचे प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्रा शासनाच्या आदेशानुसार, प्रशासनाने १५% बदल्यांचे परिपत्रक काढल्यानंतरही महावितरण प्रशासनाने मात्र फक्त JE ते AEE च्या बदल्यांना अजून मुहूर्त सापडत नसून तब्बल ऑक्टोंबर तोंडावर आले आहे, तरीसुद्धा अभियंत्यांची एकही विनंती बदली काढली नाही. उलटपक्षी कोविड सारखी भयावह परिस्थिती असतांना “अनिवार्य रिक्त पदे” ठेवण्याची अफलातून संकल्पना राबवली आहे. आधीच दुष्काळात तेरावा महिना असतांना, प्रशासन रिक्त पदे ठेउन काय साध्य करणार हे न उलगडणारे कोडे आहे. उलट रिक्त पदे ठेवल्याने अनेक समस्यांना आमंत्रण देणे ठरेल…! अनिवार्य रिक्त पदांमुळे ग्राहकांना सेवा देतांना अडचणीचे ठरेल तसेच दैनंदिन कामकाजातही अभियंत्यांवर अतिरिक्त ताण येणार असून दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होईल.

महावितरण आधीच कठीण वित्तीय परीस्थितीतून जात असतांना व क्षेत्रीय स्तरावर अनेक महत्वाची प्रश्न प्रलंबित असतांना त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे असे साबॉर्डीनेट अभियंता संघटनेने महावितरण प्रशासनाला वेळोवेळी सुचविले आहे. व त्यावर उपायही सुचविले आहेत मात्र त्याकडे प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत असून मागील काही महिन्यांपासून बदली धोरणावर जास्त लक्ष केंद्रित करीत असून त्यातही अनिवार्य रिक्त पदे ठेवणारच अशी भूमिका घेत असल्याने सर्व अभियांत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

एकीकडे कंपनीची आर्थिक परिस्थिती कठीण असतांना संघटनेने वेळोवेळी महसूल वसुलीबाबत, इंपालमेंट मधील मधील त्रुटी ई. बाबतीवर कशाप्रकारे मात करता येईल हे वेळोवेळी सुचविले आहे, मात्र हे महावितरण प्रशासन बदली या विषयावर विनाकारण वेळ वाया घालत असून संपूर्ण महाराष्ट्रातील सबोर्डीनेट इंजिनीयर्स असोसिएशनचे अभियंते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. याबाबत महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री मा डॉ. नितीनजी राऊत याना भेटून निवेदन दिले असून सदर प्रलंबित प्रश्नाबाबत लक्ष देण्याची विनंती केली आहे.

प्रशासनाने वेळीच तोडगा नाही काढला, तर सोमवारपासून निषेध आंदोलन चालु करण्याचा विचारात संघटना आहे.
मात्र आंदोलन करीत असतांना महाराष्ट्रातील कोणत्याही कोविड सेंटर/हॉस्पिटल्स/विलगीकरण कक्ष यांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची पुरेपूर दक्षता एस. ई. ए. चे अभियंते घेणार आहेत. महाराष्ट्रात कुठेही “अनिवार्य रिक्त पदे” न ठेवता सर्वच ग्राहकांना चांगल्या प्रकारे वीज सेवा मिळावी व विनंती बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अभियंत्यांना त्यांच्या विनंती ठिकाणी बदली व्हावी तसेच अनिवार्य रिक्त पदाची संकल्पना रद्द करावी, तसेच प्रशासनाने विनाकारणच्या गोष्टींना अनाठायी महत्व न देत कंपनीच्या फायद्याच्या धोरणाचा अवलंब करावा, कनिष्ठ अभियंता ते सहायक अभियंता पदोन्नती पॅनल त्वरित करावे, उपकार्यकरी अभियंता म्हणून पदोन्नती झालेल्या अभियंत्यांना त्यांच्या पॅरेंट झोन मध्ये पदस्थपना द्यावी व संघटनेस विश्वासात घ्यावे, तसेच महापारेषण मध्ये प्रमोशन पॅनल व स्टाफ सेट अपचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रशासनाने अद्यापही सदरचे मुद्दे विचारात घेतले नाहीत, महानिर्मिती मध्ये सुद्धा मेडिक्लेम पॉलिसी मध्ये त्रुटी असून अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. प्रमोशन पॅनल वेळेवर होत नाहीत. तसेच महानिर्मिती ची कमीत कमी 50% वीज विकत घेण्याचे अनिवार्य करावे. ज्याची आवश्यक नाही अश्या कंत्राटी पद्धतीला लगाम घालावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीनही कंपनीचे अभियंते कोविड परिस्थितीतही आंदोलन करतील, असा निर्वाणीचा इशारा सबोर्डीनेट इंजिनिर्स असोसिएशनचे सरचिटणीस अभी. संजय ठाकूर यांनी दिला व त्यामुळे उदभवणाऱ्या परिस्थितीची सर्वतोपरी जबाबदारी तिन्ही कंपन्यांचे प्रशासनाची राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!