Sunday, August 31, 2025
Latest:
खेडविशेषसण-उत्सव

श्रावण यात्रेसाठी भामचंद्र डोंगर बंद : भामचंद्र डोंगर सप्ताह समितीचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना
महाबुलेटीन नेटवर्क / दत्ता घुले
शिंदे-वासुली : खेड तालुक्यातील  चाकणच्या पश्चिमेकडील समस्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेले चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील श्री क्षेत्र भामचंद्र डोंगरावर श्रावण महिन्यात येथील पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या होणाऱ्या अलोट गर्दीमुळे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने डोंगर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून महाळूंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना तसे निवेदन देऊन दर सोमवारी डोंगराच्या पायथ्याशी पोलीसांचा बंदोबस्त देण्याची विनंती केली आहे.
भामचंद्र डोंगर पंचक्रोशीतील शिंदे, वासुली, सावरदरी, खालूंब्रे, भांबोली, शेलू, आसखेड, वराळे, कोरेगाव, आंबेठाण आदि गावातील भाविकांचे असिम श्रद्धास्थान असलेले व पंचक्रोशीतील हे एकमेव पवित्र, निसर्गरम्य ठिकाण आहे. डोंगरावर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी परिसरातील असंख्य भाविक येथील प्राचिन महादेव मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तसेच शेवटच्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. परंतु सध्या संपूर्ण पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड व विशेषतः खेड तालुक्यात करोना बाधीतांची संख्या वाढतच चालली आहे. जिल्हा प्रशासनाने जनमानसांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, तिर्थक्षेत्रे व मंदिरे बंद ठेवली आहेत. परंतु काही नागरिक जीवावर उदार होऊन सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंग न पाळता गर्दीत सहभागी होऊन करोनाला आमंत्रण देतात.
श्रावण महिन्यात डोंगरावर देवदर्शनासाठी गर्दी होऊन करोनाचा फैलाव होऊ शकतो, तसेच डोंगरावर वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारे अनेक साधक वास्तव्याला असतात. त्यांचे संरक्षण करण्यासाठी डोंगर पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ व सप्ताह समितीने श्रावण महिन्यात भामचंद्र डोंगर सर्व भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाळू़गे पोलीस स्टेशन, पंचक्रोशीतील पोलीस पाटलांना करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सहकार्य करुन कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी महाळूंगे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास गोसावी, पोलीस पाटील अमोल पाचपुते, गुलाब मिंडे, दिपक राऊत, राहूल साकोरे व भामचंद्र डोंगर सप्ताह समितीचे हभप. शंकर महाराज मराठे, हभप. किसन पिंजण, मालक पाचपुते, तुकाराम तरस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भामचंद्र डोंगर सप्ताह समितीने पंचक्रोशीतील सर्व भाविकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर भामचंद्र डोंगर बंद असून कोणीही देवदर्शनासाठी डोंगरावर येऊ नये, असे आवाहन केले असून डोंगराच्या पायथ्याशी व डोंगर परिसरात टाईमपास व अन्य गैरकृत्य करुन डोंगराचे पावित्र्य भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!