शासनाने दुधास तीस रुपये हमीभाव द्यावा : हर्षवर्धन पाटील
महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : दुधास तीस रुपये हमीभाव देण्याचा आदेश व सहकारी तत्वावरील दुध संस्थांचे दुध पावडर प्लँट पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत निर्देश राज्यशासनाने द्यावेत, अशी मागणी माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी ( दि.१ऑगस्ट ) केली, ती पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप व महायुतीमधील रयत क्रांती संघटना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांच्या वतीने प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारासमोर दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात १ लाख ३५ हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यास प्रतिलिटरला तीस रुपये हमीभाव दिला व राज्यातील सहकारी तत्वावरील दुधसंघांचे दुध पावडर प्लँट पूर्ण क्षमतेने सुरु झाले तर दुग्धव्यवसायावर आलेले संकट दूर होईल. ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत.
आठ महिन्यांपूर्वी राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले. मात्र त्यांनी एकही चांगला निर्णय घेतलेला नाही. कर्जमाफी केली ती ही फसवी निघाली. मुख्यमंत्र्यांच्या पुण्याच्या दौ-यात महत्वाचे निर्णय होतील असे वाटले होते. तीही अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे जनतेची घोर निराशा झाली आहे. दुध दराचा प्रश्न आहे, त्यावर तोडगा काढला जात नाही.
कर्जाचे पुनर्गठण होत नाही. दुध उत्पादकांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे, असे सांगून पाटील म्हणाले की, त्याचे अर्ज बँका स्विकारत नाहीत. राज्य शासन आमचा काही सबंध नाही म्हणून जबाबदारी झटकत आहे. स्वतः काही करायचे नाही. पंतप्रधानांनी योजना आणली म्हणून ती हाणून पाडायची, असे प्रकार थांबवा, असे पाटील यावेळी म्हणाले.
आपल्या भाषणात पाटील यांनी आपले प्रतिस्पर्धी राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री आपल्या तालुक्यातील आहेत. त्यांनी अद्यापपर्यंत दुध दरवाढीबाबत तोंडातून एक शब्द ही काढलेला नाही. उलट सहकारी तत्वावर चाललेला दुधगंगा दूधसंघ अवसायानात काढण्याचे पहिले काम त्यांनी केले. तालुका पातळीवरील दुधसंघाच्या बरखास्तीसाठी साधा नाही तर ॲडव्होकेट जनरल दर्जाचा वकील दिला, असे पाटील म्हणाले. दुधगंगाचा अमुलशी करार झाला.त्यामुळे दुध उत्पादक शेतकर्यांना अधिकचे पैसे मिळतात म्हणून संघ अवसायानात काढला का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इंदापूर तालुक्यात ज्यांच्याकडून सहा लाख लिटर दुध जमा होते त्यांचा दुधगंगा संघ आहे. ती आमची वैयक्तिक मालमत्ता नाही. तालुक्यात अनेक संस्था काढून सामान्यांना आधार देण्याचे काम आम्ही केले. ज्यांना पानाची टपरी ही काढायची माहिती नाही. ज्यांनी तालुक्यात एक संस्था ही काढली नाही, त्यांनी दुसर्याने काढलेल्या संस्था अवसायानात काढण्याचे पाप करु नये, अन्यथा जनता त्यांना कायमची विश्रांती दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत केल्याचे सांगितले जात आहे असे सांगून पाटील म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांकडून किती धान्य गोळा केले. शासकीय अधिका-यांकडून किती वर्गणी गोळा केली, हे न कळण्याइतकी तालुक्यातील जनता खुळी राहिलेली नाही.
या वेळी विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, दुधगंगा दुधसंघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, रिपाइंचे शिवाजीराव मखरे यांची या वेळी भाषणे झाली.
● कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. बाजार समितीपासून बाबा चौकापर्यंत घोषणा देत आंदोलनकर्ते प्रशासकीय भवनासमोर आले. तेथे हे आंदोलन झाले. आंदोलनाच्या काळात शासनाच्या निषेधाची फ्लेक्सची झुल पाठीवर पांघरलेली जर्सी गाय सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
● दुधासंदर्भातील आंदोलनात दूध ओतण्याचा प्रकार सर्रास दिसून येतो. येथे मात्र दुधाचे कॅन आणण्यात आले. त्यातील दुध हळद टाकून गॅसच्या स्टोव्हवर तापवण्यात आले. त्यातील दुध पोलीसांसह सर्व उपस्थितांना देण्यात आले. उर्वरित दुध कोरोनावर उपचार घेत असणा-या रुग्णांसाठी पाठवण्यात आले.