सारथी संस्थेच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी,सारथीला पाचशे कोटींचा निधी द्यावा : मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या
‘कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा, मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात’, मराठा आरक्षण कायम राहावे : मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन
महाबुलेटीन नेटवर्क : शैलेश काटे
इंदापूर : कोपर्डीच्या ताईला तात्काळ न्याय मिळावा, मराठा समाजाच्या विविध मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अश्या आशयाचे निवेदन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील, ऋतुजा नायकुडे व इतरांच्या उपस्थितीत आज ( दि.१३ जुलै ) तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले. निकिता पवळ, प्रतिभा करपे, जयंत नायकुडे, प्रा. कृष्णा ताटे, पवन घोगरे, प्रवीण पवार, राम आसबे, सचिन सावंत, प्रेमकुमार जगताप, भारत जामदार व इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
तहसिलदारांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दि.१३ जुलै हा कोपर्डीच्या भगिनीचा स्मृतीदिन राज्यभरातील मराठा समाज हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळत आहे. आपल्या या भगिनीला न्याय मिळावा म्हणून अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गाने प्रयत्न करत आहे. अद्यापपर्यंत न्याय मिळू शकला नाही. त्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी आहे. मात्र त्याबाबत सरकार गंभीर दिसत नाही. न्याय मागण्यासाठी मराठा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. परंतू न्याय मिळत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.
यावर्षी राज्यसरकारला जागे करण्यासाठी राज्यातील मराठा समाज शांततेच्या मार्गाने निषेध करीत आहे. कोपर्डीच्या नराधमांना एक महिन्याच्या आत फाशी द्यावी, अशी आमची मागणी आहे, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत. मराठा आरक्षण कायम राहावे यासाठी सरकारने आपली बाजू न्यायालयामध्ये ताकदीने मांडावी. त्यासाठी अभ्यासू कायदेतज्ज्ञ नेमावेत. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील गरीब, होतकरू युवकांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत, त्यासाठी कायदा करावा, कर्ज द्यावे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील युवकांसाठी सरकारी वसतिगृह निर्माण करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सारथी संस्थेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्याचा चौकशी अहवाल तात्काळ समोर आणावा. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. सारथीची आठ कोटी रूपयांवर बोळवण करु नये. पाचशे कोटी रूपयांचा निधी देण्यात यावा. मराठा आंदोलनातील शहिदाच्या कुटुंबियांच्या घरातील एका व्यक्तीस एस. टी. महामंडळात सामावून घ्यावे. प्रत्येक कुटंबाला पन्नास लाख रूपयापर्यंत मदत जाहीर करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
राज्यात मराठा आरक्षण चळवळीच्या काळात मराठा युवकावरील खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत या बाबत ज्या युवकावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांची बाजू मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी ऐकून घ्यावी. मराठा समाजातीत १३ हजार ५०० हुन जास्त युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व गुन्ह्यांची फेरचौकशी व्हावी. छ. शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामास सरकारने येत्या दोन महिन्यात सुरवात करावी. त्याच्या कामाचा अहवाल दर आठ दिवसांनी जनतेसमोर सादर करण्यात यावा, या मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, निवेदनातील सर्व मागण्या शासनाकडे पाठवण्यात येतील, असे तहसीलदार तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.