कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयातील कामकाज बंद असल्याने वाहनधारकांच्या अडचणीत वाढ…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयातील कामकाज बंद असल्याने वाहनधारकांच्या अडचणीत वाढ…
● पंचवीस टक्के कर्मचारी मर्यादा ठेवून आरटीओ कामकाज चालू करावे : राजू घोटाळे ( अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोशियन )
● आरटीओ कार्यालयात कामकाज सुरू करणे गरजेचे : बाबा शिंदे ( कार्यकारी सदस्य, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली )
● आदेश प्राप्त होताच तत्परतेने कामकाज सुरू करण्यात येईल. – अजित शिंदे ( प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे )
महाबुलेटीन न्यूज ( वसंत शिंदे )
पिंपरी : सरकार महाराष्ट्रातील परिवहन कार्यालय पुर्ण क्षमतेने कामकाज चालू करणार नसल्यामुळे वाहनधारकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयातील कामकाज बंद आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील वाहन मालकांवर तसेच आरटीओचे काम करणारे प्रतिनिधी, ड्रायव्हिंगस्कूल धारकांवर झाला आहे.
याबाबत शासनाने सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पंचवीस टक्के उपस्थिती ठेवून काम सुरू करावे असा आदेश दिला होता. याबाबत परिवहन आयुक्तांनी (दि.३१ मे) रोजी शासकीय परिपत्रकाद्वारे आदेश देऊन राज्यातील एकूण पन्नास परिवहन (बृहन्मुंबई वळगता) कार्यालयातील कामकाज सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे. याच बरोबर प्रत्येक भागातील कोरोनाच्या परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी वाढवून कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या पंचवीस टक्के एवढ्या संख्येनुसार काम करणे अडचणीचे ठरू शकते, असे राज्यातील परिवहन अधिकाऱ्यांचे मत असल्याचे समजते.
कार्यालयामध्ये कामकाज चालू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून प्रत्येक विभागाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करावे लागणार आहे. आरटीओ कार्यालय मध्ये सर्वात जास्त गर्दी लर्निंग लायसन काढण्यासाठी होते, त्यामुळे हा विभाग लवकर चालू होणार नाही असे दिसते. प्रत्येक विभागातील कामाला अपॉइंटमेंट घेऊन त्याच तारखेला नागरिकांना प्रवेश मिळणार असल्याचे समजते. वाहनांचे पासिंग आणि लायसन्स विभाग सोडून इतर कामे करण्याचा परिवहन विभागाचा विचार चालू आहे. सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक परिवहन कार्यालय मध्ये पेंडिंग असलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये लॉकडाउन चालू झाल्यापासून व्यवसायिक वाहनांचे कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पासिंग अभावी ही वाहने वाहन मालकांच्या घरासमोर उभी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये महाराष्ट्रा मध्ये परिवहन विभागाने या व्यावसायिक वाहनांचे सहा महिन्याचा कर माफ केला. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये व्यवसायिक वाहनांचे मालकांची आर्थिक गणित बिघडले असून सरकारने त्यांचा या वर्षीसुद्धा सहा महिन्याचा कर माफ करावा, अशी मागणी ट्रान्सपोर्ट असोशियनचे सदस्य बाबा शिंदे यांनी सरकारकडे केली आहे.
राज्यामध्ये अनेक वाहन मालकांनी अजून पर्यंत वाहनांचा कर, पासिंग, इन्शुरन्स भरलेला नाही. याचा परिणाम इन्शुरन्स कंपन्यावर सुद्धा झालेला आहे. काही खाजगी इन्शुरन्स कंपनी आपला कर्मचारी वर्ग कमी केल्यामुळे उच्चशिक्षित तरुणांना नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. अशीच अवस्था याला पुरक असलेले व्यवसाय वायरमन, पेंटर, फिटर, सुतार या सर्वांची दुकाने सध्या बंद असल्यामुळे यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याच बरोबर आरटीओचे काम करणारे मध्यस्थ प्रतिनिधी यांची संख्या महाराष्ट्रात सुमारे वीस हजार असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण नोकरी नसल्यामुळे पूर्णवेळ प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. यांची परिस्थिती सुद्धा खूप अवघड झाली आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कुलची संख्या अठरा हजार हजार इतकी असून या प्रत्येक स्कूल मालकाकडे स्वतःची वाहने प्रशिक्षक व काहींची जागेचे भाडे पंचवीस ते तीस हजार रुपये पर्यंत आहे व इतर बाकीचा खर्च याचा आर्थिक ताळमेळ सध्या कसा करावा ? हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. कारण या मधून अनेकांनी बँकेमार्फत कर्ज घेतली आहेत आणि अशाप्रकारे संकटाची कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे कर्मचारी पगार, बँकेचे हप्ते कसे भरावेत ? या विवंचनेत ड्रायव्हिंग स्कूल मालक पडले आहेत.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा वरील सर्व व्यवसायिक यांचे मुले, मुली शैक्षणिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या कोर्सला त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. भविष्यात त्याची फी कशी भरावी ? हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. मागील लाटेमध्ये काही मोटार निरीक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांना सरकारने फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत आहे. एकंदरीत सर्व काळजी घेऊन काही प्रमाणात का होईना महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालय चालू करावीत, अशी मागणी मोटर चालक व नागरिकांकडून होत आहे.
———————————–
राज्यातील सर्व ड्रायव्हिंग स्कूल कोरोना निर्बंध मध्ये पूर्णपणे बंद असून गेल्या वर्षीच्या टाळेबंदी मध्ये स्कूलचे भाडे देताना नाकी नऊ आले होते. तसेच याबाबत त्यांच्यापुढे अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने राज्यातील परिवहन कार्यालय पंचवीस टक्के कर्मचारी मर्यादा ठेवून कामकाज चालू करावे, आम्ही स्कूल चालक त्याला पूर्णपणे सहकार्य करू.
– श्री राजू घोटाळे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोशियन
——————————————
महाराष्ट्रामध्ये व्यवसायिक मोटार वाहन मालकांची एकूण संख्या सात लाख असून त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले आहेत. या देवाण-घेवाण मध्ये सरकारने वाहनांचे हस्तांतरण, बोजा नोंद बोजा कमी करणे, पासिंग करणे ही कामे आरटीओ कार्यालयात सुरू करणे गरजेचे आहे.
– बाबा शिंदे
कार्यकारी सदस्य, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली
—————————————-
परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ज्या पद्धतीने आदेश प्राप्त होईल, त्यानुसार पुणे, बारामती, पिंपरी-चिंचवड या कार्यालयामध्ये तत्परतेने कामकाज सुरू करण्यात येईल.
– अजित शिंदे
प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे
०००००