राज्यातील ग्रामपंचायतींचा अंतिम मतदार यादी प्रसिद्धीचा कालावधी पुढे ढकलला..
महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्यामुळे प्राप्त हरकतींचा निपटारा करण्यासाठी अंतिम मतदार यादी १० डिसेंबर ऐवजी १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.
एप्रिल २०२० ते जून २०२० आणि जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाकडून दि. २०/११/२०२० रोजी मतदार यादीचा कार्यक्रम निर्गमित करण्यात आला. त्यानुसार दि. ०१/१२/२०२० रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १४२३४ ग्रामपंचायतींसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक १०/१२/२०२० होता.
ग्रामपंचायतींची संख्या पाहता प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती झाल्याचे नासिक व जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले असून प्राप्त हरकतींचा निपटारा संबंधित ठिकाणी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्यास निवडणूक आयोगाकडे विनंती केली तसेच याबाबत राज्यातील अन्य जिल्ह्यातून देखील विचारणा झाली, त्यामुळे प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या हरकतींचा निपटारा करून अंतिम मतदार यादी गुरुवार दि. १० डिसेंबर २०२० ऐवजी सोमवार दि. १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.