राज्यपालांनी १२ जणांची आमदार म्हणून नियुक्ती करताना ज्या वर्गासाठी या जागा आहेत त्यांचाच विचार करावा : जेष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण ७८ जागा आहेत. त्यातील ३१ जागा विधानसभा सदस्यांमार्फत भरल्या जातात, २१ जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जातात तर १२ जागा राज्यपाल नियुक्त करतात. सध्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावाची शिफारस करायची आणि राज्यपालांनी त्यावर संमतीची मोहर उठवायची अशी ही पध्दती आहे. त्यामुळे राज्यपालांनी १२ जणांची आमदार म्हणून नियुक्ती करताना ज्या वर्गासाठी या जागा आहेत त्यांचाच विचार करावा, असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
देशमुख पुढे म्हणाले कि, “राज्यपालांमार्फत ज्या जागा निवडल्या जातात, त्या संबंधीची तरतूद घटनेच्या अनुच्छेद १७१ (५ ) मध्ये करण्यात आलेली आहे. त्यात स्पष्टपणे असा उल्लेख आहे की, राज्यपालांनी कला, साहित्य, सहकार, विज्ञान, सामाजिक कार्य आदि क्षेत्रात उल्लेखनिय योगदान दिलेल्या मान्यवरांना विधान परिषदेवर नियुक्त करावे, असा नियम आणि संकेत आहे. मात्र आतापर्यंत वारंवार या नियमांना हरताळ फासत राजकीय मंडळींनीच या जागांवर कब्जा मिळविला. त्यामुळे ज्या वर्गासाठी घटनाकारांनी १२ जागांची तरतूद केलेली आहे ते कायम दुर्लक्षित राहिले. राज्य निर्मिती नंतर आतापर्यंत १०० ते १२५ लोकांना राज्यपालांनी विधान परिषदेवर पाठविले. त्यातील ज्या वर्गासाठी या जागा आहेत त्यातील केवळ ११ जणच विधान परिषदेवर पाठविले गेले. उर्वरित सर्व राजकीय नेतेच होते. यावेळेस तरी हा पायंडा बदलला जावा आणि साहित्य, कला, पत्रकारिता आदि क्षेत्रातील मान्यवरांची विधान परिषदेवर वर्णी लागावी, अशी मागणी आम्ही राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन केली होती.”
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ३५० जिल्हा आणि तालुका संघांनी राज्यपाल महोदयांना इमेल पाठवून ज्या वर्गासाठी या जागा आहेत त्यातूनच निवड करावी, असा आग्रह धरला होता. आम्ही जेव्हा मा. राज्यपालांना भेटलो तेव्हा त्यांनी देखील सारी प्रक्रिया घटनेतील तरतुदीप्रमाणे पार पडेल, असे आम्हाला आश्वासन दिले होते. नियमांनुसार महाराष्ट्रातील तीन सत्ताधारी पक्षांनी जी प्रत्येकी चार नावं निश्चित केली आहेत, त्यातील काही नावं राजकीय आहेत. राज्यपालांनी अशी नावं स्वीकारू नयेत, अशी आमची मागणी आणि विनंती आहे. राज्यपाल ती स्वीकारणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. कारण त्यांनी आम्हाला तसा शब्द दिला आहे. समजा राज्यपालांनी ती स्वीकारलीच तर कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा असेल. राजकारण्यांना आमदार होण्याचे अनेक मार्ग मोकळे आहेत. अशा स्थितीत साहित्यिक, कलावंत, पत्रकार यांच्या जागांवर देखील राजकारण्यांनी डल्ला मारणं नियमबाह्य आणि अनुचित आहे. असेही देशमुख म्हणाले आहेत.