पुण्यातील या भाजपच्या नेत्यांचा कोरोनाशी निकराचा लढा
पुण्याचे महापौर मुरलीधर यांच्यासह आता कुटुंबातील आठ जणांना कोरोना संसर्ग
भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्यासह कुटुंबातील सहा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पंधरा दिवस होम आयसोलेट
ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह मोठा मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापाठोपाठ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आठ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काल शनिवारी ( दि. ४ जुलै ) कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.
मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. त्यात आज त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण 9 जणांना कोरोना झाला आहे. या सर्वांना सामान्य लक्षणं आहे. दरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे.मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली. चारही नगरसेवक कोरोना मुक्त झाले आहेत.
‘थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील’, असं ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
पिंपरी-चिंचवड : भोसरीचे आमदार व पिंपरी चिंचवड शहराचे भाजप अध्यक्ष महेश दादा लांडगे यांच्यासह कुटुंबातील सहा जणांना बिर्ला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला असून कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने आता ते 20 जुलै पर्यंत होम आयसोलेट होऊन उपचार घेणार आहेत. असे महेश दादांनी फेसबुक द्वारे सांगितले असून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करून मास्क घातलेला फोटो #MaskForSafePCMC #PCMCFightsCorona या हॅश टॅगला जोडून फेसबुकवर शेअर करण्याचे आवाहन केले आहे.
हडपसर : ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व हडपसर विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या मोठ्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची पत्नी व लहान मुलाचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
“दोन दिवसांपूर्वी थोडा ताप व कणकणी आली होती, कोविड – १९ ची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मला काहीच त्रास होत नाही, माझी व मुलाची तब्येत स्थिर असून कोणीही काळजी करू नये. आपल्या आशिर्वादाने, प्रार्थनेने मी लवकरात लवकर बरे होऊन आपल्या सेवेस हजर होईल. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित रहावे”, असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.