BREAKING NEWS – १३ जुलै पासून १0 दिवसांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड लॉकडाऊन : पालकमंत्री अजित पवार
महाबुलेटीन नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन, कोरोनाची साखळी तोडण्याकरीता पुणे, पिंपरी-चिंचवडसह दोन्ही महापालिकेच्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गावे पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैपासून पुढचे १0 दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली प्रशासनाकडून लवकरच जारी करण्यात येईल.
सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येईल.
नागरिकांनी काळजी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी दिला होता. ‘कोरोनाचा संसर्गाचा आकडा वाढत आहे. तरीही काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता बिनधास्तपणे फिरत आहेत. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.
तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व शहरात पोलिस प्रशासनास बंदोबस्ताबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्वच स्तरातील प्रशासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित असल्याचे अधिकृत सुत्राकडून सांगण्यात आले. तसेच अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला या लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
या विषयी अधिक माहिती देताना डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले कि , सध्या १३-१८ जुलै हा कडक लॉकडाऊन असेल यात फक्त दूध,मेडिकल आणि दवाखाने चालू राहतील याचप्रमाणे पाणी पुरवठा , स्वच्छता या विषयी सेवा चालू राहातील. त्या नंतर चे आदेश १९ जुलै पर्यंत येतील.वाढती रुग्ण संख्या पाहून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले