पुणे ग्रामीण जिल्हयातील रेस्टॉरंट व बार मधून पार्सल जेवनासोबत मद्य (लिकर) पार्सल देण्याची परवानगी मिळावी – बाळासाहेब दाते
पुणे ग्रामीण जिल्हयातील रेस्टॉरंट व बार मधून पार्सल जेवनासोबत मद्य (लिकर) पार्सल देण्याची परवानगी मिळावी – बाळासाहेब दाते
प्रसन्नकुमार देवकर
पुणे : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत इतर जिल्यांतील सुधारित आदेशाप्रमाणे पुणे ग्रामीण जिल्हयातील रेस्टॉरंट व बार मधून पार्सल जेवनासोबत मद्य (लिकर) पार्सल देण्याची परवानगी मिळण्याची मागणी पुणे जिल्हा (ग्रामीण) हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब दाते यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊन मूळे पुणे जिल्हयातील रेस्टॉरंट व बार गेली वर्षभर बंद आहेत. देशहितासाठी तसेच राज्याच्या हितासाठी आणि राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी, कोरोना महामारी राज्यात नियंत्रणात राहण्यासाठी लॉकडाऊन मध्ये हॉटेल व्यवसाय बंद ठेवले आहेत.
● जिल्हयातील सर्व हॉटेल व्यावसायिकांच्या वतीने असोसिएशनने लेखी पत्राद्वारे खालील प्रमाणे मागण्या केल्या आहेत.
१) पुणे जिल्ह्यातील सर्व एस. ई. झेड, एम. आय. डी. सी आणि औद्योगीक विभागातील सर्व हॉटेल ,रेस्टॉरंट आणि बार चालू करावेत. त्यामुळे औद्योगीक विभागातील कामगार व अधिकारी व तेथे येणाऱ्या मालवाहतूक कर्मचाऱ्यांची उदर निर्वाहाची सोय होईल.
२) गेली वर्षभर लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक संकटांना कंटाळून काही हॉटेल व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. कृपया शासनाने हॉटेल व्यावसायीकांना एक वर्षाची नूतनीकरण फी, विक्री कर आणि लाईट बिल माफ करावेत. तसेच हॉटेल व्यावसायीकांना आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे.
३) राज्य उत्पादन शुल्काची मिशन ऑलआऊट योजना प्रभावीपणे राबवून अवैध मद्य विक्री, मद्यवाहतूक, हातभट्टी, बनावट देशी – विदेशी मद्य निर्मिती या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे.
४) वाईन शॉप मधून अवैध हॉटेल आणि धंद्यांना मद्य साठा मिळत असल्यामुळे अवैध धंदे फोफावले आहेत. यावर नियंत्रण आनन्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी.
५) मेहेरबान जिल्हाधिकारी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका तसेच वाशिम जिल्हाधिकारी यांनी १/६/२०२१ रोजी परित केलेल्या सुधारित आदेशा प्रमाणे ग्रामीण भागातील रेस्टॉरंट व बार मधून होम डिलिव्हरी /पार्सल देण्याची परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे आपणही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दुपारी २ वाजे पर्यंत रेस्टॉरंट व बार मधून मद्य व जेवणाची पार्सल सुविधा त्वरित चालू करावी व हॉटेल व्यावसायिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे.
कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे (एस. ओ. पी) प्रामाणिकपणे पालन करून शासनाला संपूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही पुणे जिल्हा (ग्रामीण) हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब दाते यांनी दिली आहे.
०००००