पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शवागार ( डेड हाऊस ) तीन आठवड्यांपासून बंद, केव्हा पूर्ववत चालू होणार ? नागरिकांचा सवाल
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचा आंदोलनाचा इशारा…
डॉ.पवन साळवे, डॉ. राजेंद्र वाबळे म्हणतात चालू आहे!
आयुक्त म्हणतात दुरुस्तीचे टेंडर काढले!
ठेकेदार म्हणतो पार्टच उपलब्ध नाही, कधी चालू होणार सांगू शकत नाही
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : येथील महानगरपालिकेचे शवागार गेली आठवड्यांपासून बंद असून ते केव्हा पूर्ववत चालू होणार? किंवा होणार की नाही, याची कोणतीच खात्री नाही. परंतू याबाबत प्रशासनाचे अधिकारी मात्र अनेकदा खोटी माहिती देत असल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शवागारातील कुलींग प्रणालीसाठी लागणार्या कॉम्प्रेसरचे स्पेअर पार्टस् खराब झाले असून ते उपलब्ध होत नसल्याने ही प्रणाली पूर्ववत सुरु होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
शवागारात गेल्या एकवीस दिवसांपासून बर्फाच्या लाद्या मागवून त्यावर मृतदेह ठेवले जात आहेत. मात्र ते तात्पुरते स्वरुपात एखादी रात्र मृतदेह ठेवण्याची सुविधा या शवागारात नाही.
यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी पवन साळवे तसेच वायसीएमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वाबळे हे दोघेही शवागार चालू आहे. थोडे दिवस ते बंद होते, अशी खोटी माहिती देत आहेत.
तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर शवागार बंद असल्याचे मान्य करतात, परंतू त्याच्या दुरुस्तीचे टेंडर काढले आहे व वर्क ऑर्डर दिली असल्याचे सांगतात.
यासंदर्भात संबंधित ठेकेदाराकडे माहिती घेतली असता संबंधित कॉम्प्रेसरचे स्पेअरपार्टस् उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, परंतू ते केव्हा मिळतील याची खात्री देता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
आज याबाबत पक्षनेते नामदेव ढाके यांनीही संबंधित अधिकार्यांकडून माहिती घेतली त्यावेळी त्यांनाही हा अनुभव आला. डॉ. वाबळे यांनी ढाके यांना शवागार चालू असल्याचे सांगितले, तर आयुक्तांनी कामाची वर्क ऑर्डर दिली असल्याचे सांगितले.
कोरोनाच्या काळात गरज नसलेल्या अनेक गोष्टी थेट पद्धतीने खरेदी करण्यात शहाणपण दाखविणारे शवागर दुरुस्तीसाठी का ते शहाणपण दाखवत नाहीत ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
यासंदर्भात हे शितगृह दोन दिवसांत सुरु न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा माजी नगरसदस्य व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिला आहे.